आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूर थट्टा:फडणवीस सरकारची पूरग्रस्तांसाठी 6 हजार कोटी, तर ठाकरे सरकारची वादळग्रस्तांसाठी 1 हजार कोटींची मदतीची घोषणा

महेश जोशी/ मंगेश फल्ले/प्रिया सरीकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार बदलले, आश्वासने तीच, पीडित वाऱ्यावरच

रायगड आणि पुणे जिल्ह्यातील दरडग्रस्तांसाठी तसेच सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी शासनाच्या वतीने मदतीच्या घोषणांचा पाऊस पडतो आहे. नेत्यांचे दौरे होतात आणि सांत्वनाची आश्वासने दिली जातात. दिवस सरतात आणि त्यातील बरीच आश्वासने पुराच्या पाण्यात वाहून जातात हा अनुभव. गेल्या दोन वर्षांत राज्यात उद्भवलेेला महापूर, निसर्ग चक्रीवादळ आणि तौक्ते वादळ याचा फटका बसलेल्या पीडितांसाठी हजारो कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा झाली. प्रत्यक्षात झळ बसलेल्या लोकांपर्यंत ही मदत अद्यापही पोहोचली नाही. त्याचा हा वृत्तांत...

प्रत्यक्षात : दोन वर्षे उलटूनही १४५ कुटुंबे मदतीच्या प्रतीक्षेत
सांगली जिल्ह्यातील ब्राह्मनाळ गाव. २०१९ च्या महापुरात हे संपूर्ण गाव उभ्या पिकासह पाण्याखाली गेले होते. मदतकार्य करणारी बोट बुडून १७ जणांना जलसमाधी मिळाली होती. यंदाही या गावातील ७० टक्के घरांमध्ये पाणी शिरले आहे. गेल्या वेळी जाहीर झालेली नुकसानभरपाई पूर्णपणे मिळाली नसल्याची माहिती गावच्या सरपंच उत्तम बंडगर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली. त्या वेळी शासनाने शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी १ लाख रुपयांची, तर कुटुंबांना १० हजारांची मदत जाहीर केली होती. पडलेल्या घरांना मदत मिळाली, मात्र पिकांच्या नुकसानीची भरपाई ३४५ बाधित कुटुंबांपैकी फक्त २०० कुटुंबांना मिळाली, १४५ कुटुंबांपर्यंत दोन वर्षांनंतरही ही मदत पोहोचली नसल्याचे सरपंच बंडगर यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांच्या मोटारी वाहून गेल्या, त्या देण्याची घोषणा केली होती, प्रत्यक्षात त्याचीही पूर्तता झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. गुरांसाठी ३० हजारांची भरपाई जाहीर झाली होती, मात्र जी वाहून गेली त्यांचे ना पंचनामे झाले ना भरपाई मिळाली, असे ते म्हणाले.

नुकसान लाखांचे, भरपाई हजारात
सन २०१९ च्या महापुरात कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेली शाहुपुरी कुंभार गल्ली पूर्णपणे बुडाली होती. कुंभार बांधवांचे संसार तर बुडाले होतेच पण कष्ट करून साकारलेल्या लाखों गणेशमूर्तींची माती झाली होती. एकट्या उदय कुंभार यांच्या मुर्तीशाळेत पाच ते आठ फुटांचे शंभर गणपती आणि आडीचशे लहान गणेश मूर्ती होत्या. त्या महापूरात मुर्तींचे नुकसान झालेच, शिवाय रंगकामासाठीची यंत्रे व रंग साहित्याचेही मोठे नुकसान झाले. सरकारी पंचनाम्यातच १५ लाखांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली, पण १ लाखांवरील पूरग्रस्तांना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आल्याने तेवढीच नाममात्र मदत मिळाल्याचे मूर्तीकार कुंभार यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे.

२०१९ : सांगली-कोल्हापूरचा महापूर
आश्वासने : राज्य शासनातर्फे ६ हजार कोटींच्या मदत निधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यापैकी ४,७०८ कोटी रुपये कोल्हापूर, सांगली व साताऱ्याच्या मदतीसाठी, तर २,१०५ कोटी कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील नुकसानीसाठी देण्यात येणार आहेत. - देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री, १३ ऑगस्ट २०१९

प्रत्यक्षात : ‘निसर्ग’, ‘तौक्ते’चा फटका, मदत एकाचीही नाही
रायगड जिल्ह्यात १६०० हून अधिक पोल्ट्री फार्म असून निसर्ग आणि ताैक्ते चक्रीवादळाने व्यवसायाचे नुकसान झाले. पंचनाम्यानंतर तौक्तेमध्ये ३ ते ३.५ कोटी, तर निसर्गमध्ये ७.८ कोटी रुपयांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली. परंतु दोन्हीपैकी एकाचीही नुकसान भरपाई पोल्ट्री व्यावसायिकांना मिळाली नसल्याचे पेण तालुक्यातील रामराज येथील मनोज दासगावकर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

मनोज यांच्या पोल्ट्रीतील १०० च्या वर पक्ष्यांचा मृत्यू झाला, प्लास्टिक फाटले, पाइपलाइन तुटल्या, तर तूस खराब होऊन दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. वादळानंतर दौऱ्यांवर आलेल्या सर्व नेत्यांपुढे त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. प्रत्यक्षात आश्वासनाखेरीज अजून काहीही मदत मिळाली नसल्याचे दासगावकर सांगितले.

१,१८३ नौकांचे नुकसान, भरपाई फक्त ५ हजारांची
पालघर | नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना मोठा फटका बसला. शासनाच्या उद्योग मंत्रालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केलेल्या केलेल्या अहवालानुसार तौक्ते चक्रीवादळात ७ मच्छिमार बेपत्ता झाले तर १५६ मासेमारी नौकांचे शंभर टक्के तर १,०२७ नौकांचे अंशत: नुकसान झाले. त्यात सहा महिने काम पूर्णपणे ठप्प झाल्याने झालेले नुकसान वेगळेच. या बदल्यात, शासनातर्फे या मच्छिमारांना फक्त ५ हजार रुपयांची भरपाई मिळाली. ही चेष्ठा असून, नौकांवरील यंत्रसामग्री, जाळी आणि त्यासाठीचा खर्च विचार केला तर प्रत्येकाचे नुकसान लाखांच्या घरात असल्याचे मत मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष किरण कोळी यांनी “दिव्य मराठी’कडे मांडले. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी ३ ते १० लाखांप्रमाणे वाढीव भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे.

२०२० : निसर्ग चक्रीवादळ
आश्वासने : वादळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे १०४० कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला. त्यापैकी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून महाविकास आघाडी सरकारने ७८० कोटी रुपयांच्या मदत निधीस मंजुरी दिली आहे. मदतीच्या निकषांमध्ये तिपटीने वाढ केली. घरांच्या नुकसानीसाठी ९५ हजारांची भरपाई दीड लाख केली आहे. : उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, १० जून २०२०

बातम्या आणखी आहेत...