आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • Flyovers Will Be Constructed On The Highway To Prevent The Danger Of Floods; Testimony Of Deputy Chief Minister Ajit Pawar During His Visit To Kolhapur; News And Live Updates

उपाय:​​​​​​​महापुराचा धोका टाळण्यासाठी महामार्गावर उड्डाण पूल उभारणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापूर दौऱ्यात ग्वाही

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गायरान जमिनींचा विचार
  • शिरोली पुलानजीक राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढवण्याबाबत नितीन गडकरींशी चर्चा करणार

महापुरामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ पाण्याखाली जातो. हजारो वाहने अडकून पडतात. प्रचंड वित्तीय नुकसान होते. महापुरापासून सुटका होण्यासाठी या महामार्गावर पुराचे पाणी येणाऱ्या ठिकाणी पुलाच्या कमानी रस्त्याखाली बांधण्यात येतील. जेणेकरून पावसाचे पाणी न थांबता पुढे वाहते राहील. आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येतील. पुणे-बंगळूर व कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर हे उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तातडीने चर्चा केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पूरग्रस्तांना राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानीबाबत या भागातील मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. ‘पुराचे संकट ओढवलेल्या नागरिकांना उभे करण्याचे काम राज्य शासन करेल,’अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पवार म्हणाले, शिरोली व किणीजवळ पुराचे पाणी आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. दूध, इंधन, अन्नधान्याची वाहतूकही ठप्प झाली.

भविष्यात अशी परिस्थिती ओढवू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सन २००५, २०१९ व २०२१ मधील पुराच्या पाण्याच्या पातळीचा विचार करून महामार्गाची उंची वाढवण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करू. तर राज्य मार्ग व अंतर्गत मार्गांची कामे राज्य शासनासह वर्ल्ड बँक व अन्य बँकांच्या सहकार्यातून केली जातील, असे त्यांनी सांगितले.

गावरान जमिनीवर ‘रहिवासी चाळ’
पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी गावातील उंच ठिकाणच्या गायरान जमिनींची निवड करावी. जिल्ह्यातील दत्त, गुरुदत्त, जवाहर आणि शरद या साखर कारखान्यांच्या परिसरात “रहिवासी चाळ’ उभी केल्यास कायमस्वरूपी स्थलांतरित होण्यास इच्छुक नसलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय होईल. इतर वेळी ऊसतोड कामगारांची या ठिकाणी व्यवस्था होईल, असे पवार यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांचे सादरीकरण
या वेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनीही महापुराने झालेल्या हानीबाबत माहिती दिली. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. पूरबाधित गावांमध्ये एनडीआरएफ पथक, जिल्हा प्रशासन व स्वयंसेवकांच्या मदतीने पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...