आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंचगंगेने घेतला मोकळा श्वास:पहील्यांदाच नदीमध्ये सुमारे पाच लाख मूर्तींचे विसर्जन झाले नाही.

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाला कोल्हापूरकरांची शंभर टक्के साथ

कोल्हापूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेले अनेक वर्षे चळवळ सुरू आहे. त्यात प्रशासनाला काही प्रमाणात यशही येत होते मात्र अनेकजण धार्मिक परंपरेनुसार वाहत्या पाण्यातच मूर्ती विसर्जित करीत होते. नदीचे प्रदुषण होतच होते. यंदा मात्र कोविड महामारीच्या पार्श्र्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलिस दल व महापालिका प्रशासनानेही पर्यावरणपूरक विसर्जनासाठी मोठी जनजागृती केली. कोल्हापूरकरांनीही उस्फुर्त साथ दिली. परिणामी पंचगंगेत यंदा एकही गणेशमूर्ती विसर्जित झाली नाही. बर्याच वर्षांनंतर पंचगंगेने मोकळा श्वास घेतला.

कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत दरवर्षी सुमारे पाच लाखावर लहान मोठ्या गणेश मूर्ती, निर्माल्याचे विसर्जन केले जात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीचे प्रदुषण होत होते. यंदा प्रथमच शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या विसर्जनाच्या परंपरेत बदल झाला. पंचगंगा नदी मध्ये एकही गणेशमूर्ती विसर्जित झाली नाही. गतवर्षीपर्यंत नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जीत केल्या जात होत्या. विसर्जनानंतर नदीच्या पाण्यातील धुलीकणांचे प्रमाण (suspended solids) वाढलेले असायचे. यासह पिग्मेंट, केमिकल, हेवी मेटल यांचेही प्रमाण वाढत होते. परिणामी पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण (DO) कमी होवून पाण्याची जैविक, रासायनिक (BOD, COD) हानी होत होती. नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत.

कोल्हापूरात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे गर्दीची ठिकाणे टाळावीत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. विसर्जनासाठी शहरातील रिकाम्या मैदानावर विसर्जन कुंडाची उभारणी केली होती.

प्रतिकात्मक विसर्जन करुन नागरीकांनी मूर्ती प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. या मूर्ती प्रशासनाच्या वतीने खणींमध्ये विसर्जित केल्या. यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावनांचीही जपणूक झाली. यापुढेही विसर्जनाची ही पध्दत कायम ठेवावी अशी मागणी नागरीकांतून होत आहे. मूर्ती विसर्जन, निर्माल्य विसर्जन झाले नाही. नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हा उपक्रम सर्वत्र राबविण्याची गरज आहे असे उच्च न्यायालयाने पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रणासाठी गठित केलेल्या समितीचे सदस्य, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

जिल्ह्यातील १३ नद्या प्रदुषण मुक्त

कोल्हापूर जिल्ह्यात १२३८ गावे, सर्वत्र गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड उभारणी केली होती. जिल्ह्यातील एकाही नदीत मूर्ती विसर्जन झाले नाही. परिणामी पंचगंगेसह जिल्ह्यातील १३ नद्या प्रदुषण मुक्त झालेल्या आहेत.

- पंचगंगेतील पाच नद्या अशा : कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी आणि सरस्वती.

- या नद्यांच्या संगमातून पंचगंगेचा उगम

- पंचगंगा नदी खोऱ्यात १७४ गावे

- नदीची लांबी ३३८ किलोमीटर

अनंत चतुर्दशी असुनही पंचगंगेत एकही गणेशमूर्ती विसर्जित झाली नाही. ऐतिहासिक पंचगंगा घाट व निर्मळ वाहणाऱ्या पंचगंगा नदीचे छायाचित्रकार दिपक जाधव यांनी टिपलेले हे छायाचित्र.