आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठबळ:कोरोनामुळे विधवा झालेल्या सर्व महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार : कृषिमंत्री दादाजी भुसे

कोल्हापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे. कोल्हापुरात राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

कृषी विभागाची कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची आढावा बैठक कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, कोल्हापूर व सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनुक्रमे जालिंदर पांगरे व मनोजकुमार वेताळ आदी उपस्थित होते.

दादाजी भुसे म्हणाले की, शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासू नये, यासाठी राज्यव्यापी नियोजन करण्यात आले असून गरज भासल्यास बफर स्टॉकमधून खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील. याबाबतीत गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करा. शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, जेणेकरून दुबार पेरणी करावी लागणार नाही.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- राज्यात सोयाबीन व कापूस उत्पादकता वाढीसाठी १ हजार कोटींची तरतूद आली.
-मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजना या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.
-‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेप्रमाणे मागणीनुसार पिके घ्यावीत.
-ठिबकवरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर जादा दर देण्याबाबत प्रयत्न राहील.
-कृषी विभागाच्या योजनांचा लाभ महिला शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी ५० टक्के निधी राखीव ठेवण्यात येत आहे.

चंदगडच्या काजूच्या मानांकनासाठी प्रयत्न
कोल्हापुरी गुळाच्या नावावर अन्य राज्यातील गुळाची विक्री होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येतील. कोल्हापुरी गूळ, आजरा घनसाळ तांदळाला भौगोलिक (जीआय) मानांकन मिळाले आहे. कोल्हापुरी गूळ, आजरा घनसाळ तांदूळ, सांगलीचे बेदाणे (मनुके) व हळद उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी या उत्पादनांचे मूल्यवर्धन करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच चंदगड भागातील काजूला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व हातकणंगले तालुक्यात संकरित भाजीपाला बियाणे उत्पादन सुरू होण्यासाठीही सहकार्य करू, असेही भुसे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...