आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या पदन्यासाने भल्याभल्यांची झोप उडवणारी, तरुणांच्या हृदयाची धडकन झालेली, सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारी नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम चक्क एका बैलाच्या वाढदिवशी ठेवण्यात आला आहे. सातारकरांच्या या खुळ्या नादाची एकच चर्चा आहे.
नृत्यांगना गौतमी पाटीलचे नृत्य ठेवण्यासाठी राज्यभरातून चढाओढ लागते. तिचा कार्यक्रम म्हटले की, टाळ्या आणि शिट्ट्यांची नुसती बरसात होते. हेच पाहता हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. तिचे मानधनही गब्बर असते. जावळी तालुक्यातल्या खर्शीचे (जि. सातारा) बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले. ते दरवर्षी आपल्या अश्विन या बैलाचा वाढदिवस झोकात साजरा करतात. बरे त्यांच्या अश्विनने महाराष्ट्र चॅम्पियन गाजवलेली. त्याचा आज तिसरा वाढदिवस. दरवर्षी ते अश्विनच्या वाढदिवशी सांस्कृतिक कार्यक्रम घेतातच. मात्र, या वर्षी त्यांनी चक्क गौतमी पाटीलच्या लावणीचा बार उडवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आज सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम ठेवण्यात आला. लावणी पाहण्यासाठी मोठी पब्लिक जमायची शक्यता गृहीत धरून शेतात स्टेज उभारले गेले आहे.
मुलाच्या वाढदिवशी कार्यक्रम...
साताऱ्यात पाच वर्षांच्या आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी थेट गौतमी पाटीलचा शो आयोजित केला होता. सातार्यातील खोजेवाडी गावातील 5 वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी 'होऊ दे खर्च' म्हणत चक्क गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम ठेवल्याने जिल्ह्यात या वाढदिवसाची जोरदार चर्चा होती. त्यानंतर आता चक्क बैलाच्या वाढदिवशी हा कार्यक्रम होत आहे.
सतत राहते वादात
नृत्यांगणा गौतमी पाटील आणि वाद हे समीकरणच झाले आहे. गौतमी पाटील आपल्या डान्समध्ये अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप प्रतिभा शेलार यांनी एक तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मृणाल कुलकर्णी यांनी ही गौतमी पाटील हिच्या नृत्यावर आक्षेप घेत साताऱ्यात तक्रार दाखल केली होती.
माफीही मागावी लागली
गौतमी पाटीलच्या नृत्याचे व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल झाले होते, यात अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली. लावणी क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी देखील गौतमीवर टीका केली होती. यामुळे अखेर गौतमी पाटील हिने माफी मागितली होती.
धक्कादायक चित्रफित केली
गौतमी पाटील एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना तिची कोणीतरी चोरून ध्वनीचित्रफित तयार केली. त्यानंतर समाजमाध्यमावर संबंधित ध्वनीचित्रफित प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारानंतर एका 32 वर्षीय महिलेने पुण्याच्या विमानतळ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली होती.
लवकरच येतोय चित्रपट
गौतमीचा लवकरच 'घुंगरू' नावाचा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचे शूटिंग थायलंडमध्ये पार पडले. याशिवाय सोलापूर, माढा, हंपी या ठिकाणीही चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती बाबा गायकवाड यांनी केली आहे. तेच या चित्रपटात गौतमीसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचे म्हटले जाते आहे. बाबा गायकवाड यांनी या चित्रपटाचे लेखनही केल्याचे समजते. यापूर्वी एका लोकप्रिय मराठी मालिकेत बाबा गायकवाड झळकले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.