आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोणंद- नीरा रस्त्यावर भवानीमाता मंदिरासमोरच्या उतारावर रात्री दुचाकीला इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरने पाठीमागून धडक दिल्याने बाळूपाटलाची वाडी गावचे माजी सरपंच व त्यांचा नातू ठार झाले. या घटनेमुळे बाळूपाटलाचीवाडी गावावर शोककळा पसरली. हणमंत दिनकर धायगुडे (वय ६५) व ओम विजय धायगुडे (वय १०) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे जण बाळूपाटलाची वाडी येथून दुचाकीवरून लोणंद- नीरा रस्त्यावरून लोणंद बाजूकडून नीराकडे निघाले होते. भवानीमाता मंदिर चढावर आल्यावर तेथे गाडी थांबवून मंदिरात दर्शन करून पुन्हा गाडीवर बसून ते नीराकडे जायाला निघाले होते. त्यावेळी पाठीमागून (लोणंद बाजूकडून) भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये हणमंत धायगुडे हे जागीच ठार झाले, तर जखमी ओमला उपचारासाठी लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचून अपघातात जखमी ओमला दवाखान्यात व हणमंत यांना लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. रात्री उशिरा या दोघांचेही शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी टँकर ताब्यात घेतला असून, चालक फरारी झाला आहे.
बाळूपाटलाची वाडीचे माजी सरपंच हणमंत धायगुडे हे सरपंच असताना त्यांच्या कार्यकाळात स्वच्छता अभियानात चांगली कामगिरी केल्याबद्दल गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते तो पुरस्कार स्वीकारला होता याची आठवण ग्रामस्थ काढत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.