आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे:विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातंय का? छाप्यांवर मुश्रीफांची प्रतिक्रिया

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पहाटे 6 वाजताच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले आहेत.

हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीसह आयकर विभागानेही छापे टाकल्याची माहिती आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयासह 100 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्यांनी केला होता. या प्रकरणीच ही छापेमारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

छाप्यांवर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया:आधी नवाब मलिक, आता मी, नंतर अस्लम शेख; विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातंय का?

आधी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली. आता माझ्यावर कारवाई केली जात आहे. यानंतर काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यावर कारवाई होईल, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. हे सर्व पाहता विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना टारगेट केलं जातंय का? अशी शंका येते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. सविस्तर वाचा...

यापूर्वीही छापे

हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी यापूर्वीही हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे पडले आहेत. जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागानं केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावरही आयकर विभागाने छापा टाकला होता.

प्राथमिक माहितीनुसार आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आज ईडीने छापे टाकले आहेत. किरीट सोमय्या यांनीच या कारखान्यात हसन मुश्रीफांनी आपल्या जावयासोबत मिळून तब्बल 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. हसन मुश्रीफ यांनी हे आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. तसेच, असे आरोप केल्यामुळे किरीट सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावाही करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते.

स्थानिक पोलिसांनाही माहिती नाही

दरम्यान, आज ईडीने छापेमारी करताच कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हमजे हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या छाप्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याचे समोर आले आहे. पहाटेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांच्या घरात प्रवेश केला आणि छाप्यास सुरुवात केली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

छाप्याबाबत माहिती मिळताच हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुश्रीफांच्या घरामसोर जमा झाले आहेत. कार्यकर्त्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहे. तसेच, काही कार्यकर्त्यांनी कागल बंदचा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर कागलमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

किरीट सोमय्यांचे नेमके आरोप काय?

  • साखर कारखान्यात मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने 100 कोटींपेक्षा अधिकची भ्रष्टाचारातून मिळालेली रक्कम गुंतवली
  • हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बोगस कंपन्या, शेल कंपन्या यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मनी लाँडरिंग, बेनामी संपत्ती विकत घेतली.