आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंद्रकांत पाटील यांना एवढी मस्ती कुठनं आली असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री पाटील यांच्यावर केला आहे. मंत्री मुश्रीफ यांनी श्री पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कागलमध्ये वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी मुश्रीफ यांना विचारले की, नवीनकुमार जिंदल यांच्या वक्तव्यावरून भाजपने माफी मागण्याची मागणी तुम्ही केल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात की हसन मुश्रीफ यांना काय म्हणायचं ते म्हणू दे, आम्ही माफी मागणार नाही. यावर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या आजारपणाचा संबंध भाजपच्या मीडिया सेलचा प्रमुख नविनकुमार जिंदाल याने वाझे प्रकरणाशी जोडला होता. त्यामुळे भाजपने माफी मागावी अशी मागणी केली होती. यामध्ये मी काय चुकीचं बोललो होतो? असा सवालही मुश्रीफ यांनी केला. यावेळी पुढे बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटलांची लायकी नाही, तो अतिशय भित्रा माणूस आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकाही विधानसभेच्या जागेवर उभारण्याची त्यांची लायकी नाही, त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा सोडून ते पुण्याला गेले. भाजप सरकारच्या गेल्या मंत्रिमंडळात अपघातानेच त्यांना महसूल मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा असे दोन नंबरचे स्थान मिळालं. कोल्हापुरातून पळून जावं लागलेल्या माणसानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक व सोज्वळ व्यक्तीवर बोलणे योग्य नाही.
सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेत...
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. राज्यात ५५ हजार बालक बाधित झाली आहेत. राजकारण किती करायचं? याला काही मर्यादा आहे की नाही. देवेंद्र फडणवीस असोत की चंद्रकांत पाटील असोत, सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न करू देत, कसलेही व काहीही आरोप करु देत, महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालणार आहे. अशा घटनाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मंत्री मुश्रीफ यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.