आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर आज पहाटेच ईडीने धाड टाकल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषत: कागलमधील मुश्रीफ समर्थक आक्रमक झाले आहेत. कागलमधील एका पप्पूनेच ईडीआडून हसन मुश्रीफांवर वार केल्याचा आरोप मुश्रीफ समर्थकांनी केला आहे.
तसेच, किरीट सोमय्या यांनाही कागलमधील या भाजप नेत्यानेच हसन मुश्रीफांविरोधात कागदपत्रे पुरवली, हसन मुश्रीफांवर कारवाई व्हावी, यासाठी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात याच नेत्याने चकरा मारल्या, असेही आरोप मुश्रीफ समर्थकांनी केले आहेत. स्वत: हसन मुश्रीफ यांनीही स्थानिक भाजप नेत्याने दिल्लीत चकरा मारल्यानंतर माझ्यावर ईडीची धाड पडली, असा आरोप दीड महिन्यापूर्वी केला होता. त्यामुळे हसन मुश्रीफांना लक्ष्य करणारा कागलमधील भाजपचा नेता कोण? यामागील स्थानिक राजकारण काय?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
कोल्हापुरात भाजपला हसन मुश्रीफांचेच आव्हान
हसन मुश्रीफ हे कागल मतदारसंघातून सलग 5 वेळेस आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निष्ठावान म्हणून ओळखले जातात. हसन मुश्रीफ यांच्यामुळे राष्ट्रवादीचा गड बनलेल्या कागल मतदारसंघावर आपला झेंडा फडकवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कोल्हापुरातील सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजपला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यातही हसन मुश्रीफ यांचेच मुख्य आव्हान आहे. विशेष म्हणजे 2019ला याच हसन मुश्रीफ यांना भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. मात्र, आपण शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याचे सांगत हसन मुश्रीफ यांनी ही ऑफर धुडकावून लावली.
मुश्रीफांना आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न
चंद्रकांत पाटलांची ऑफर धुडकावल्यानंतर हसन मुश्रीफांना भाजपकडून सातत्याने टार्गेट केले जात आहे. त्यात एक नाव सातत्याने समोर येत आहे, ते म्हणजे कोल्हापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतसिंहसिंह घाटगे यांचे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत समरजीतसिंहसिंह घाटगे यांनी मुश्रीफांविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी मुश्रीफांना आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अगदी हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेच्या कारभारावरुनही त्यांनी मुश्रीफांना लक्ष्य केले आहे.
आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीतसिंहसिंहसिंह घाटगे या दोघांमध्येच चांगलाच सामना रंगणार, असे चित्र आहे. मुश्रीफांना हरवूनच आमदार होणार, असा पण समरजीतसिंह घाटगे यांनी केला आहे. हसन मुश्रीफांना शह देण्यासाठी समरजीतसिंह घाटगे यांनीच त्यांना ईडीच्या फेऱ्यात अडकवले, किरीट सोमय्यांना मदत केली, असा आरोप त्यामुळेच हसन मुश्रीफांनी केला आहे.
छापेमारीत माझा संबंध नाही- समरजीतसिंह घाटगे
पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफांनी सांगितले होते की, समरजीतसिंह घाटगे यांनी माझ्यावर कारवाईसाठी दिल्लीत 3 ते 4 दिवस चकरा मारल्या. त्यानंतर कोल्हापुरात माझ्या कारखान्यावर धाडी पडल्या. भ्रष्टाचाराची खोटी कागदपत्रे त्यांनीच ईडीकडे सुपूर्द केली.
समरजीतसिंह घाटगे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. समरजीतसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत यावर भूमिका स्पष्ट करत सांगितले होते की, हसन मुश्रीफ यांच्या घरावर पडलेल्या छापेमारीत माझा संबंध नाही. मी या प्रकरणात कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आड लपून मला काहीही करण्याची गरज नाही. मी किरीट सोमय्या यांना कागदपत्रे पुरवल्याचा आरोप होत आहे. परंतु तसे करण्याची मला गरज नाही. हसन मुश्रीफ यांच्या घरावर कारवाई झाली त्यावेळी मी दिल्लीला गेलो होतो याचा अर्थ असा नाही की मी ईडीच्याच कार्यालयात गेलो होतो. हे सर्व आरोप बालिश स्वरुपाचे आहेत. चौकशीला सामोरे जाण्याऐवजी मुश्रीफ स्टंटबाजी करत आहेत.
मुश्रीफ समर्थक आक्रमक
नेत्यांमध्ये आरोप, प्रत्यारोप काहीही होत असले तरी कागलमधील मुश्रीफ समर्थक समरजीतसिंह घाटगेंविरोधात आक्रमक झाले आहेत. आज हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर जमलेले कार्यकर्ते ईडी, भाजप तसेच समरजीतसिंह घाटगेंविरोधात घोषणाबाजी करत आहे. दुसरीकडे, हसन मुश्रीफांवर ईडी काय कारवाई करणार?, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत याचा काय परिणाम होईल? समरजीतसिंह घाटगे म्हणजे भाजपला कितपत फायदा होईल का?, हे निवडणुकीतच स्पष्ट होईल.
संबंधित वृत्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.