आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 विधवांच्या हस्ते ऐतिहासिक ध्वजारोहण:कराड जवळील येणके गावाचे क्रांतिकारी पाऊल, इंडिया-लिम्का बुकने घेतली नोंद

सातारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा जिल्ह्यातील येणके (ता. कराड) गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 विधवा महिलांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. या क्रांतीकारी उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. यावेळी 75 स्तंभांवर ध्वजारोहण करण्यात आले. विधवा प्रथा बंदीचा ठराव, हळदी-कुंकवाच्या उपक्रमानंतर येणके गावाने विधवांच्या हस्ते ध्वजारोहण करून क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. या ध्वजारोहणाची इंडिया बुक आणि लिम्का बुकने देखील नोंद घेतली आहे.

तीन हजार लोकसंख्या असलेल्या येणके गावात विधवा प्रथा बंदीचा ठराव यापुर्वीच झाला आहे. त्यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा 75 विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहणाने साजरा करण्याचा क्रांतिकारी निर्णय ग्रामस्थांनी घेतला. सोमवारी सकाळी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. भगवे फेटे बांधलेल्या 75 विधवा माता-भगिनींच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरीक, महिला आणि युवतींची लक्षणीय उपस्थिती होती.

देशभक्तीने वातावरण भारावले

संपुर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा झाला. त्याच उत्साहात येणके गावात देखील ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने विधवा महिलांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव पाहायला मिळाले. शाळेच्या प्रांगणात 75 लोखंडी ध्वज स्तंभ उभारण्यात आले होते. प्रत्येक स्तंभावर विधवा महिलेच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आल्या. राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीतांनी येणके गावातील वातावरण भारावून गेले. ध्वजारोहणानंतर सर्व महिलांनी गावातून रॅली काढली. तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. हा सोहळा नेत्रदीपक आणि ऐतिहासिक ठरला.

इंडिया, लिम्का बुकमध्ये नोंद

आजवर देशात कुठेही विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र येणके गावाने एकाच विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोह करण्याऐवजी भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील 75 विधवा माता-भगिनींच्या हस्ते ध्वजारोहण केले. या क्रांतिकारी आणि ऐतिहासिक ध्वजारोहणाची नोंद इंडिया बुक, लिम्का बुकने घेतली आहे. लवकरच या सोहळ्याचे रेकॉर्डिंग घेऊन अधिकृतरित्या इंडिया आणि लिम्का बुकमध्ये या सोहळ्याची नोंद केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...