आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास तब्बल 100 गावांचे स्थलांतर

सांगली / गणेश जोशीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारने खंबीर भूमिका न घेतल्यास पूरस्थितीची शक्यता

कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची ५ मीटरने वाढवल्यानंतर हे धरण तब्बल १७३ टीएमसी पाणी क्षमतेचे होणार आहे. मात्र, या निर्णयाने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कायमच महापुराची स्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्र शासनाने कर्नाटक शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात खंबीर धोरण न घेतल्यास सांगली, शिरोळसह सुमारे १०० गावांचे स्थलांतर करण्याचा अब्जावधी रुपयांचा खर्च सोसावा लागणार आहे.

अलमट्टी धरण सध्या ५१९.६० मीटर उंचीचे आहे. या धरणात सध्या १२३ टीएमसी पाणीसाठा होतो. या धरण क्षमतेलाही महाराष्ट्राने हरकत घेतली होती. राष्ट्रीय जल आयोग आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात धावही घेतली होती. परंतु त्यावेळी कर्नाटकने कृष्णा खोऱ्यातील आपल्या हिश्शाचे पाणी अडवण्यासाठी ५१९ मीटर उंची परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार ही परवानगी दिली. परंतु आता कर्नाटकच्या विधिमंडळात या धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा निर्णय संमत झाल्यानंतर धरणाच्या उंचीवरून महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात मोठ्या वादाला तोंड फुटणार आहे.

कृष्णा लवादाच्या अंतिम निकालाची राज्यपत्रात नोंद झाल्यानंतर सक्षम प्राधिकरणाच्या सल्ल्यानुसार धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतल्याची सारवासारव कर्नाटक करत असले तरी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणून या अलमट्टी धरणाची मोठी ओळख आहे.

पाच लाख नागरिकांवर स्थलातंराची वेळ: कर्नाटकच्या या निर्णयाने त्यांच्या राज्यातील सुमारे ६२ गावांना लाभ होईल, असा दावा करण्यात येत असला तरी सांगली आणि कोल्हापुरातील ३० मोठी गावे व सुमारे ११० लहान गावे कायमची विस्थापित होऊ शकतात. सांगली महापालिकेच्या आठ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ५ लाख नागरिक कायमचे विस्थापित होऊ शकतात. याबरोबरच लाखो हेक्टरमधील बागायती शेतीचे क्षेत्र नष्ट होणार आहे.

..तर सांगलीचा ९० टक्के भाग जलमय: सध्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी अलमट्टी धरणामुळे १२ ते १५ फुटांच्या आसपास असते. मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत हीच पाणीपातळी ३५ ते ४० फुटांपर्यंत जाते. आणि अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग केला गेला नाही तर ही पातळी ६० फुटांपर्यंत जाऊन पोहोचते. त्यामुळे सांगली शहरातील ६० टक्के जनतेला महापुरामुळे विस्थापित व्हावे लागते. अलमट्टीची उंची ५२४.२५ पर्यंत केली गेली तर सांगलीजवळ कृष्णेची पातळी कायमस्वरूपी ३५ फूट राहील तर मान्सूनमध्ये पाणी पातळी ६५ ते ७० फुटांपर्यंत जाईल. सांगलीचा ८० ते ९० टक्के भाग जलमय होणार असून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ६०० गावांना या महापुराचा फटका बसू शकतो. दरवर्षी अब्जावधी रुपयांच्या नुकसानीचा फटका बसेल. पूरप्राधिकरण स्थापन करा: अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाने सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने पूर प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाणी फाउंडेशनच्या वतीने काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे.

अलमट्टीमुळेच पूर येताे : जलतज्ज्ञांचा निष्कर्ष
देशभरातील अनेक जलतज्ज्ञांनी अलमट्टीमुळेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यातील नद्यांना दरवर्षी महापूर येतो, असा निष्कर्ष काढला आहे. तरीही कर्नाटकचे मुख्यमंत्री व माजी जलसंपदामंत्री बोम्मई व विद्यमान जलसंपदामंत्री गोविंद कारजोळ यांच्या हट्टामुळे दक्षिण महाराष्ट्राची वाताहत होणार आहे. कर्नाटक शासनाचा हा निर्णय महाराष्ट्र-बेळगाव व सीमा भागावरील आपला कायमचा हक्क सोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...