आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या जिंजी किल्ल्यास आज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. त्याच्या जतन, संवर्धनाबाबत जिंजी किल्ल्याला भेट दिल्यानंतर मा. मुख्यमंत्री यांच्याशी याविषयी खासदार संभाजीराजे यांनी फोनवर सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिंजी किल्ल्यावरील राजसदरेच्या संवर्धनासाठी व याठिकाणी मराठा हिस्ट्री गँलरी उभारणीसाठी तात्काळ ५० लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले. याबाबत संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक ठेवा जतन करुन वस्तूसंग्रालय उभारण्यासाठी व राजसदरचे संवर्धन करण्यासाठी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ५० लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पाऊलखुणा संपूर्ण देशभरात पसरलेल्या आहेत. त्याचं जतन, संवर्धन, आणि प्रसार करण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने जाणिवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
काय आहे जिंजी किल्ल्याचे महत्व...
छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना महाराजांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला. पूर्वी असलेल्या किल्ल्याचे नुतनीकरण करुन महाराजांंनी हा किल्ला नव्याने बांधून घेतला.मराठ्यांच्या इतिहासात दुर्गराज रायगडला जितकं महत्व आहे तितकंच महत्व जिंजीच्या किल्ल्याला सुध्दा आहे. शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. छत्रपती संभाजी महाराजांना फंदफितूरीने पकडून छळ करुन मारण्यात आले. त्यावेळी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले आणि तिथून राज्यकारभार पाहू लागले. यामुळे औरंगजेबाला आपले निम्मे सैन्य दक्षिणेकडे पाठवावे लागले. परिणामी स्वराज्यावरील मुघल सैन्याचा दबाव कमी झाला व मराठ्यांनी गेलेले किल्ले व प्रदेश पुन्हा जिंकून घेतले. जिंजीसारखा अभेद्य किल्ला पाहताना महाराजांच्या दूरदृष्टीची जाणीव पदोपदी होत होती. पूर्वी या ठिकाणी कृष्णगिरी, राजगिरी, चंद्रयान दुर्ग (चंद्रगिरी) हे वेगवेगळे तीन किल्ले होते ; तिथे संरक्षणाच्या दृष्टीने तटबंदी बांधून तिघांचा मिळून एक किल्ला शिवाजी महाराजांनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.