आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागामालक आणि शाळेची इमारत बांधणारा यांच्यातील वादामुळे गुरुजीसह विद्यार्थी रस्त्यावरील झाडाखाली, तर जागामालकाची जनावरे शाळा खोलीत पोहोचली आहेत. या वादातून कोल्हापूर जिल्ह्यातील धनगरमोळा (ता. आजरा) येथील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
एकीकडे पटसंख्येअभावी अनेक शाळा अडचणीत असताना दुसरीकडे सतरा वर्षे विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेली ही शाळा समाधानकारक पटसंख्या असूनही केवळ संस्थाचालक, जागामालक व इमारत मालक यांच्यातील वादामुळे अडचणीत आली आहे. या शाळेतील मुले अक्षरश: झाडाखाली बसून शिक्षण घेत आहेत. याबाबत शाळा इमारतीच्या मालकाविरोधात पोलिसांतही तक्रार देण्यात आली. पण याकडेही सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे. धनगरमोळा येथे सतरा वर्षांपूर्वी आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. कालांतराने स्थानिक पालकांनीही या शाळेला उत्तम प्रतिसाद देत आपल्या पाल्याला पाठवण्यास सुरुवात केली. शाळा अद्याप अनुदानित नसली तरी अनुदानाच्या टप्प्यावर आली असताना अचानक शाळा इमारतीच्या जागेचे मूळ मालक व ज्यांनी इमारत उभा केली. त्यांच्यात इमारतीच्या मालकीवरून वाद सुरू झाले आहेत.
बाकांसह शालेय साहित्य खोलीबाहेर फेकले
श्री हिरण्यकेशी डोंगरी ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ, आजराद्वारे संचालित माउली माध्यमिक विद्यालय २०१२ पासून ग्रुप ग्रामपंचायत सुळेरान येथील गट नं २२० मध्ये सुरू करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे या संस्थेने स्वतः खर्च करून बांधलेल्या इमारतीत २० एप्रिल २०१३ रोजी झालेल्या भाडे करारानुसार आजतागायत शाळा भरत होती. मात्र १४ मे २०२२ रोजी २०१२ पूर्वीचे जमिनीचे मूळ मालक निवृत्ती भीमा शेटगे व त्यांचे वारस प्रवीण अर्जुन शेटगे व परशराम अर्जुन शेटगे यांनी कुलूप तोडून कार्यालयातील कपाट, महत्त्वाची कागदपत्रे, तिजोरी, बाक, पुस्तके व संगणक बाहेर फेकले.
वर्ग भरताहेत उघड्यावर
नुकत्याच राज्यभरातील शाळा सुरू झाल्या. शाळांत विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले. आम्ही मात्र मुलांचे स्वागत करू शकलो नाही. आमच्यासमोर शाळा भरवायची कुठे, हा प्रश्न आहे. सध्या आम्ही झाडाखाली शिक्षण देत असलो तरी पावसाळ्यात कुठे वर्ग भरवायचे? हा प्रश्न भेडसावत आहे. शासनाने आमच्या बिकट परिस्थितीचा विचार करून शाळेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. -अरुण महादेव सावंत, शिक्षक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.