आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन संघर्ष:चीनने 1962 नंतर 45 हजार चौकिमी भूभाग बळकावला, हे सत्यच : शरद पवार

सातारा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजकीय पक्षांना सल्ला : राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करू नका

भारत-चीन संघर्षावर काँग्रेस-भाजपत वाक््युद्ध सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण होऊ नये, असे म्हटले आहे. साताऱ्यात ते म्हणाले, १९६२ मध्ये काय झाले हे आपण विसरू शकत नाही. चीनने आपला ४५ हजार चौरस किलोमीटर भूभाग बळकावलेला आहे आणि हे सत्य आहे. याकडे पूर्वीच दुर्लक्ष करण्यात आलंय असं दिसतंय.

सध्याच्या संघर्षात चीनने पुन्हा असेच केले की नाही याची मला माहिती नाही. मात्र, या मुद्द्यावर बोलताना आपण इतिहास विसरू नये. मोदी सरकारने चीनसमोर शरणागती पत्करल्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. पी. व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये संरक्षणमंत्री राहिलेले पवार म्हणाले, मला सध्या युद्धाची शक्यता वाटत नाही. मात्र चीनने उघडपणे ही आगळीक केली आहे. गलवानमध्ये भारताने स्वत:च्या हद्दीत बांधकाम केेले.

कोविडची भीती : कोरोनासोबत जगायचे आहे

लोकांना कोरोनासोबत जगायचे आहे, याचा विश्वास निर्माण व्हावा यासाठी मी महाराष्ट्रभर फिरतोय. राज्यातील माध्यमे फारच जागरूक असल्याने पुणे-मुंबईसह औरंगाबादेत कोरोनाची परिस्थिती अधिक ठळकपणे पुढे आली. यातूनच लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर धास्ती घेतली.

सहकार : आरबीआयच्या नियंत्रणाचा प्रयत्न

राज्याची अर्थवाहिनी नागरी सहकारी बँका आणि मल्टिस्टेट बँकांवर रिझर्व्ह बँकेचे पूर्ण नियंत्रण आणण्याचा केंद्र शासनाने घेतलेला निर्णय हा राज्यातील सहकार चळवळीसाठी बाधक ठरू शकतो. सहकार चळवळ खिळखिळी करून ती संकुचित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

इंधन : केंद्र सरकार दरवाढ करून गैरफायदा घेत आहे

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. परंतु या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलसह इंधनाचे दर रोजच वाढत चालले आहेत. याआधी इतिहासात असे कधी झाले नव्हते. मात्र, नेमक्या लॉकडाऊनच्या काळातच लोक सहन करताहेत. याचा गैरफायदा केंद्र सरकार घेत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

पडळकर : डिपॉझिट जप्त झालेल्यांवर काय बोलायचे?

भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी जहरी शब्दांत टीका केली होती. त्यावर पवार म्हणाले, विधानसभा- लोकसभा निवडणुकीसह इतर निवडणुकांत लोकांनी डिपॉझिट जप्त केलं. ज्यांना लोकांनी बाजूला केलं त्याची दखल कशाला घ्यायची, त्यांना काही महत्त्व देण्याची गरज नाही. अशा व्यक्तीच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही.

१९९३ मध्ये मी संरक्षणमंत्री असताना चीनशी केली होती शस्त्रसंधी...

१९९३ मध्ये मी संरक्षणमंत्री असताना दोन्ही देशांतील सैनिकांनी शस्त्राचा वापर करायचा नाही, असा करार करून शस्त्रसंधी केली होती. गलवान खोऱ्यात भारत-चिनी सैनिकांत धुमश्चक्री उडाली. यात सैनिकांकडून शस्त्रास्त्रांचा वापर न झाल्याने अद्यापही शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही. या घडलेल्या प्रकारामुळे संरक्षणमंत्र्यांचे हे अपयश आहे असे म्हणता येणार नाही. तसा आरोपही करणे अयोग्य ठरेल.

बातम्या आणखी आहेत...