आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंवर जयंत पाटलांची टीका:राज ठाकरे भूमिका बदलतात हे आता महाराष्ट्राच्या लक्षात आले; त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज

सांगली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे नेहमीच आपली भूमिका बदलत असतात त्याची वेगवेगळी कारणे आहेत. ते का भूमिका बदलतात हे संपुर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आले आहे. त्यामुळे लोक ते जे करतात ते फारसे गांभीर्याने घेत नाहीत. ते नकला चांगल्या करतात आणि ते बघण्यासाठी सभांना गर्दी होते. लोक गांभीर्याने घेत नाहीत याचे आत्मचिंतन करण्याची गरज राज ठाकरेंना आहे, असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. पाटील सध्या सांगलीत असून, पत्रकारांशी ते बोलत होते.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी ठाण्यातील उत्तरसभा आणि औरंगाबादेतील सभेत पुन्हा भोंग्याबाबतस वक्तव्य केले. मशिदींवरील भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन ते खाली उतरवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. राज ठाकरेंनी औरंगाबाद येथे जाहीर सभेत कार्यकर्त्यांना मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवण्याची सूचना केल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. याबाबत आता जंयत पाटील यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, जयंत पाटलांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेल्या आरोपावर देखील प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला होता. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

“नाना पटोलेंनी केलेल्या आरोपानंतर मी जिल्ह्याच्या तपशील घेतला. त्यातून जो इतिहास समोर आला तो आपल्याला सांगणे आवश्यक आहे. 2010 मध्ये काँग्रेसचे 14 सदस्य निवडून आले होते त्यावेळी सुद्धा काँग्रेस पक्षाने भाजपासोबत युती करुन राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर ठेवले. 2015 मध्ये राष्ट्रवादीचे 15 तर काँग्रेसचे 16 सदस्य निवडून आले त्यावेळी गोपाळ अग्रवाल आणि इतरांनी भाजपासोबत जाऊन राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवले. या सगळ्या गोष्टी आमच्या प्रमुखांनी राष्ट्रीय पातळीवरील लोकांच्या कानावर घातल्या होत्या पण काही फरक पडला नाही,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

पुढे ते म्हणाले की, "6 मे रोजीच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपासोबत युती करुन त्यांचा सभापती आणि काँग्रेसचा उपसभापती करण्यात आला. 10 मे रोजी झालेल्या भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला सोबत घेतले. त्यामुळे ज्या-ज्या गोष्टी पूर्वी ठरल्या त्यातल्या कोणाचेच पालन काँग्रेसने केले नाही,” असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...