आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाने मंगळवारी गंभीर वळण घेतले. बेळगावच्या चौकात कन्नड वेदिकेच्या गंुडांनी लोळण घेत वाहने अडवली. हिरेबागवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या ६ ट्रकची तोडफोड केली. बसेसच्या छतावर चढून कानडी झेंडे फडकावले. या वेळी त्यांना विरोध करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, सीमा भागात कन्नडिगांची हडेलहप्पी सुरू असताना राज्यात शिंदे सरकारचे मंत्री नुसतेच निषेध करून इशारे देत होते. याउलट राष्ट्रवादी-शिवसेनेसह सर्वच विरोधक आक्रमक होऊन कर्नाटक सरकारवर तुटून पडले होते. इकडे, कर्नाटकची सीमा आणि कन्नडिगांचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूत बोलताना सांगितले. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र मंगळवारी दिवसभर बेळगाव प्रश्नावर चकार शब्दही काढला नाही. वर्षा निवासस्थानी त्यांनी आपल्या गटाच्या मंत्र्यांची बैठक घेतल्याचे समजते. परंतु मुख्यमंत्री पडद्यामागेच राहिले. उपमुख्यमंत्री फडणवीस हेच प्रसारमाध्यमांना सामोरे गेले.
सीमेवर कन्नडिगांनी घातलेल्या धुमाकुळीचे संतप्त पडसाद कोल्हापूर, पुण्यात उमटले. कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्यासाठी कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेळगाव सीमेवर धाव घेतली. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौरा रद्द केल्याने त्यांचा निषेध व्यक्त करत कर्नाटक सीमाभागात शिरण्याचा प्रयत्न केला असताना महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पुण्यात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटकातील बसेसच्या काचेवर ‘जय महाराष्ट्र’ असे लिहून गाड्यांना काळेही फासले. दरम्यान सीमावाद पेटला असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मंगळवारी दुपारी कर्नाटककडे जाणाऱ्या आपल्या एसटी बसेस रद्द केल्या आहेत.
४८ तासांत हल्ले थांबले नाही तर मला बेळगावला जावे लागेल : शरद पवार
कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे सीमाभागातील परिस्थिती गंभीर बनली असून यावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. अशा वेळी केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. येत्या ४८ तासांत मराठी भाषिकांवरील हल्ले थांबले नाही तर मला बेळगावला जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. सिल्व्हर ओक निवासस्थानी दुपारी पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्र्यांच्या फोनचा उपयोग नाही
दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन वातावरण सुरळीत करण्याची गरज होती. उपमुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला असे त्यांनी स्वतः सांगितले. चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचा उपयोग झालेला दिसत नाही.
सर्वपक्षीय खासदारांनी एकत्रित यावे
महाराष्ट्राची भूमिका ठरवताना सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. बुधवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी एकत्रितपणे केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन परिस्थिती त्यांच्या कानावर घातली पाहिजे.
४८ तासांत बेळगावला जाण्याची वेळ पवारांवर येणार नाही : देवेंद्र फडणवीस
४८ तासांत हल्ले थांबले नाही तर बेळगावला जाऊ असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. त्यावर ४८ तासांत बेळगावला जाण्याची वेळ पवारांवर येणार नाही. महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाची संपूर्ण स्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घालू अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी बेळगावात घातलेल्या धुमाकूळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी आपण दूरध्वनीवर लगेचच चर्चा केली आणि या घटनांबद्दल त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनांसंदर्भात तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे,असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे पवारांनाही निमंत्रण
मुळात मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक आधी घेतली आणि या प्रश्नात लक्ष घातले. त्या बैठकीला शरद पवारांना सुद्धा आमंत्रित केले होते. कदाचित प्रकृतीमुळे ते येऊ शकले नसावेत. त्यांनी सीमा प्रश्नी नेहमीच चांगलीच भूमिका घेतली आहे. ४८ तासांत पवारांना तेथे जाण्याची वेळ येणार नाही. असेही फडणवीस यांनी सांगितले.
दिव्य मराठी विश्लेषण : निवडणुकीसाठी बोम्मईंची चिथावणीखोर वक्तव्ये
दुष्काळग्रस्त भागावर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जत तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकात समाविष्ट करण्यासाठी तथाकथित ठराव केल्याचा दावा केला गेला. परंतु एकाही ग्रामपंचातीने प्रत्यक्षात असा ठराव केलेला नाही. याउलट बेळगाव नगरपालिकेसह निपाणी, खानापूरसह सुमारे १५ ते २० स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला महाराष्ट्रात सामील करावे असा अधिकृत ठराव अनेक वेळा केला असताना त्याची दखल कर्नाटक सरकारने आतापर्यंत घेतलेली नाही, हे विशेष.
महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातमध्ये हलवणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, इतर भाजप नेत्यांनी केलेली अवमानकारक वक्तव्ये यामुळे भाजपबाबत निर्माण झालेली संदिग्धता या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीही सीमाप्रश्न उकरून काढला गेल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा ठरवताना देशातील भाषावार प्रांतरचनेचे निकष लावण्यात आले नाहीत. त्याचे ठोस पुरावे महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दिले आहेत. त्यामुळेही कर्नाटकचे धाबे दणाणले असून प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री चिथावणीखोर वक्तव्ये करून सीमावादाला खतपाणी घालत आहेत.
बोम्मईंची चिथावणीखाेर भूमिका
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनच चिथावणीखोर भूमिका व त्यांच्या सरकारकडून हल्ले होत असतील तर देशाच्या ऐक्याला धक्का आहे. हे काम कर्नाटकातून होत असेल तर केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही.
निवडणुकांचा संबंध नाही : बोम्मई
सीमाप्रश्न आणि पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुका याचा संबंध नाही. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र हा मुद्दा उकरून काढतो आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.
कर्नाटकात आजपासून आंदोलन
कन्नड वेदिके संघटनेेने बुधवारपासून कर्नाटकात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली. मात्र, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.