आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बेळगाव येथे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जाणार्या मराठी बांधवांना आज बेळगावात रोखण्यात आले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर आज अडविले. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघाले होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. 1956 पासून संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र झाला. त्यानंतर प्रत्येक वर्षी बेळगावात 17 जानेवारीला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला जात असतो. यावर्षीही आज बेळगाव सीमाभागातील बांधव हुतात्मा दिनी अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. दरम्यान यावर्षी हुतात्मा दिनीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावात दाखल होणार असल्याचे कारण देत सुरक्षेसाठी अभिवादन करण्यासाठी जाणार्या मराठी बांधवांना कर्नाटक सरकारकडून रोखले गेले. मंत्री यड्रावकर यांनाही कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी त्यांचा ताफा रोखला. यावेळी राज्यमंत्री यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांच्या या कारवाई विरोधात राज्यमंत्री यड्रावकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी केली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव आणि सीमाभागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू आणि बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात येईल, असा विश्वास आम्हाला वाटतो आम्ही हुतात्म्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही, असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भेटीची वेळ
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी मागितली होती. ती देखिल नाकारण्यात आली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अमित शहा यांची भेट घेऊन सीमाप्रश्नाच्या संदर्भात आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांना जाणीव करून देणार होते.
कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध
राज्यघटनेनुसार देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा सामान्य नागरिकांचा हक्क आहे, मात्र देशाचे गृहमंत्री अमित शाह बेळगावात येत असताना तो हक्क नाकारला जात असल्याने आम्ही कर्नाटक पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करतो, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.