आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकमध्ये जातो म्हणताच जत तालुक्यातल्या सीमावर्ती भागातल्या गावांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज 'एमआयडीसी'ची घोषणा केली. आता या गावातले नागरिक काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या गावांनी कर्नाटकात जायचा इशारा दिलाय. पंढरपूर, नांदेड आणि नाशिकमध्यल्या काही गावांनीही अशीच मागणी केलीय. त्यामुळे सरकारच्या डोक्याचा ताप वाढलाय.
नेमके प्रकरण काय?
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील लोकांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न आहे. यातून मार्ग निघावा म्हणून त्यांनी राज्य सरकारला कर्नाटकात जायचा इशारा दिलाय. शिवाय नांदेड आणि नाशिक जिल्ह्यातल्या गावांनीही स्थानिक प्रश्न न सुटल्यामुळे कर्नाटकात जाऊ, अशी धमकी दिलीय. तर पंढरपूर कॉरिडॉर रद्द करा अन्यथा कर्नाटकात जाऊ, असा इशारा पंढरीच्या रहिवाशांनी दिलाय. त्यामुळे नागरिकांचे न सुटलेले प्रश्न आता सरकारसाठी डोकेदुखी ठरतेय.
काय म्हणाले उद्योगमंत्री?
उद्योगमंत्री उदय सामंत आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जत तालुक्यातल्या गावांसाठी 'एमआयडीसी' स्थापन करणार असल्याची घोषणा केली. सामंत म्हणाले की, जत तालुक्यातल्या लोकांना पाणी मिळत नाही. त्यांची ही समस्या लवकरात लवकर सोडवू. शिवाय तालुक्यात शंभर हेक्टरच्या परिसरात 'एमआयडीसी'ची उभारणा करू. त्यासाठी आठ दिवसांत मुंबईत बैठक घेऊ.
कोर्टात भूमिका मांडू
सीमाप्रश्नी सामंत म्हणाले की, हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तिथे आम्ही सरकारची बाजू मांडू. मात्र, सध्या सुरू असलेल्या अनेक गोष्टी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दृष्टीनेही योग्य नाहीत. महाराष्ट्रातली जनता संयमी आहे. दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री चर्चा करतील. दोन्ही राज्यात वादळ निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊ.
आचारसंहिता संपली की...
सामंत पुढे म्हणाले की, आचारसंहिता संपली की पुन्हा येईन. लोकांशी चर्चा करेन. मुख्यमंत्री सुद्धा येतील. जत तालुक्यात दोन जमिनी आहेत. त्यावर उद्योगनगरी उभारा. 24 एकर जमीन पिकवा, अशी मागणीय. जनतेच्या मागण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलू. सर्व समस्या सोडवू.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.