आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक सीमेवर कन्नडिगांची दडपशाही सुरू असून, सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या होणाऱ्या महामेळाव्याला अचानक परवानगी नाकारली. इतकेच नव्हे, तर कोगनोळी टोलनाक्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची धरपकड सुरू केलीय. त्यामुळे सीमा भागावर असंतोषाचे वातावरण आहे.
कन्नडिगांच्या उन्मादाचे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही पडसाद उमटले. याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला प्रश्न विचारत धारेवर धरले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उत्तर देत सीमावादावर राजकारण करू नये. आपण सारेच सीमावासीयांच्या पाठिशी उभे राहू, असे आश्वासन दिले.
नेमके काय घडले?
महाराष्ट्र एकीकरण समितीने आज महामेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र, या मोर्चाला कर्नाटकने अचानकपणे परवानगी नाकारली. बेळगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 लागू करून जमावबंदी लागू केली. महामेळाव्यासाठी तयार केलेले व्यासपीठही पोलिसांनी काढले. संध्याकाळी हे साहित्य महाराष्ट्र एकीकरण समितीला देणार असल्याचे सांगण्यात आले.
खासदार मानेंना पत्र
बेळगावमधल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला खासदार धैर्यशील माने यांना अध्यक्ष म्हणून निमंत्रण देण्यात आले होते. त्यांनी या महामेळाव्याला जायची तयारीही केली. मात्र, त्यांना कन्नडमध्ये एक पत्र पाठवून परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले. बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली. बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नीतेश पाटील यांनी रविवारीच हा आदेश काढलाय.
'मविआ'चे नेते धडकले
कन्नडिगांच्या अरेरावीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेळगावमध्ये जायचा निर्धार केला. शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ, संजय पवार, विजय देवणे हे सीमेवर धडकले. मात्र, कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटकच्या वतीने तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
कर्नाटक पोलिस म्हणतात...
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी दिली नाही, अशी माहिती बेळगावचे पोलिस उपायुक्त रवींद्र गाडादी यांनी दिलीय. ते म्हणाले, महामेळाव्यात अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेतलाय. तर काल स्टेज उभारायला परवानगी दिली. मात्र, आज अचानक परवानगी नाकारणे हे गळचेपी असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी देत सीमाप्रश्नी आक्रमक होण्याचा इशारा दिलाय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.