आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर:कोल्हापूरात रुग्णांची हेळसांड सुरूच, बाधितांच्या आकड्यात दररोज वाढ

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोल्हापूरात दररोज कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय. परिणामी जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी बेड शिल्लक नाही. खासगी रुग्णालयांमध्येही उपचारासाठी रूग्णांना दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. असाच एक प्रकार उजेडात आला असून कोरोना बाधित महिला रुग्णांला उपचार न मिळाल्याने जीव गमावला आहे.

शुक्रवारी रात्री एक महिला अत्यवस्थ झाल्याने घरच्यांनी तिला समीपच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण संबंधित रुग्णालयाकडून उपचारासाठी दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यानंतर शासकीय रुग्णालयातही हाच अनुभव आला. शहरातील अनेक नामवंत रुग्णालये गाठली पण कोणीच दाद दिली नाही. अखेर नातेवाईकांनी आक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून घरीच आक्सिजन लावले. पण केवळ चारच तास रुग्ण तग धरु शकला. मृत्यूनंतरही हेळसांड सुरूच राहीली. संबंधित रुग्णाला श्र्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांचा स्वैब दिला होता, ज्याचा रिपोर्ट शनिवारी पौजिटीव्ह आला. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी स्थानिक प्रशासनाला कळवले. चार तास मृतदेह घरी होता पण कोणतीच यंत्रणा कामी आली नाही. अखेर नातेवाईकांतील चार तरुणांनी खासगी लैबमधून पीपीई किट उपलब्ध करून अंत्यसंस्कार केले.

दरम्यान या सर्व प्रकाराबाबत युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या प्रकाराची चौकशी करून कारवाई करु असे सांगितले. तसेच आज कोल्हापूरातील २५ खासगी रुग्णालये ताब्यात घेतली.जिल्हास्तरावर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली.