आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहू छत्रपती यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापुरात निकाली कुस्तीचे मैदान भरवण्यात आले होते. या कुस्तीत गंगावेश तालमीचा मल्ल महान भारत केसरी सिंकदर शेख याने पंजाबचा मल्ल भारत केसरी गौरव मच्छीवाला याला चारीमुंड्या चित केले.
सिंकदर शेख यांने एकचाक या खास डावावर दुसऱ्याच मिनिटाला विजय मिळवला. शनिवारी झालेल्या कुस्ती मैदानातील क्रमांक एकची कुस्ती जिंकत कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानाचे आपणच 'सिंकदर' आहोत, हे या पैलवानाने पुन्हा एकदा सिध्द केले.
मैदान खचाखच भरले
शनिवारी कुस्ती पंढरीत जणू कुस्ती शौकिनांचा महापूर आला होता. कोल्हापूरचे कुस्तीसाठीचे खासबाग मैदान खचाखच भरलेले होते. अनेक दिवसांनी हलगीचा कडकडाट, टाळ्या, शिट्या या मैदानात दुमदुमल्या. लाल मातीचा सुगंध दरवळला. निकाली कुस्तीचे मैदान पैलवान सिकंदर शेख यांनी मारले. त्यानंतर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गदा, फेटा, श्रीफळ देऊन पैलवान सिकंदर शेख यांचा सत्कार करण्यात आला.
शाहूंनी जनकल्याणाचा वारसा जपला - शरद पवार
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची समतेची विचारधारा जनकल्याणाचा वारसा जपण्याचे कार्य शाहू छत्रपतींनी केला आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सायंकाळी खासबाग कुस्ती मैदानात व्यक्त केले. अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांच्या हस्ते शाहू छत्रपती यांचा चांदीची गदा, फेटा, शाल देऊन सत्कार करण्यात आला.कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापूरच्या जनतेने त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले.
महाराष्ट्राला मार्गदर्शन
शरद पवार म्हणाले, देशात अनेक राजे होऊन गेले. त्यांची राज्ये त्या त्या राजांच्या नावाने ओळखली जात होती. पण एक राज्य असे होते ते भोसल्यांचे नव्हते तर रयतेच होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. म्हणूनच त्यांच्याबद्दल सर्वांना अभिमान आहे. राजर्षी शाहू महाराजांनी रयतेचे राज्य केले. तोच आदर्श, तोच वारसा शाहू छत्रपती जपत आहेत.शाहू छत्रपतींनी अनेक क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत. शैक्षणिक संस्था तर अतिशय उत्तमरित्या चालविल्या आहेत. त्यांचे मार्गदर्शन केवळ करवीर नगरीलाच नाही, तर महाराष्ट्राला व्हावे अशी अपेक्षा आहे.
शिवाजी विद्यापीठाने कला, क्रीडाविषयक उपक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा केला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी शाहू छत्रपती महाराजांना दीर्घायुरारोग्य लाभो, अशा सदिच्छा या प्रसंगी दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.