आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:कळंबा मध्यवर्ती कारागृहातील दोन कोरोना बाधित कैद्यांनी केले होते पलायन, कोल्हापूर पोलिसांनी पुन्हा आवळल्या मुसक्या

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोंदाजी नंदिवाले आणि प्रतीक सरनाईक अशी या दोघांची नावे आहेत.

गुरुवारी 13 मे च्या मध्यरात्री सुमारे 12.30 वाजता येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कोरोना बाधित दोन कैद्यानी त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या तात्पुरत्या कारागृहातून ( आय.टी.आय.कोविड सेंटर मधून ) जेल पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धूम ठोकली होती. त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र गेल्या दहा दिवसांपासून कसून शोध घेत कोल्हापूर पोलिसांनी या दोन कैद्यांच्या मुसक्या आवळून त्यांना हातकणंगले येथून आज जेरबंद केले. गोंदाजी नंदिवाले आणि प्रतीक सरनाईक अशी या दोघांची नावे आहेत.

कळंबा मध्यवर्ती कारागृहातील आणि बिंदू चौक येथील सबजेल मधील काही कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासनाने या कोरोनाबाधित कैद्यांवर उपचारासाठी कळंबा येथील आयटीआय मध्ये तात्पुरते कारागृह उभारून यामध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले.व याठिकाणी कैद्यांना उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र गुरुवारी 13 मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोंदाजी नंदिवाले आणि प्रतीक सरनाईक यांनी कारागृह सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देत तेथून पोबारा केला.सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्नही केला मात्र ते सापडले नाहीत.या कैद्यांपैकी नंदिवाले हा जबरी चोरीतील तर प्रतीक सरनाईक हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे.

या संदर्भात कारागृह प्रशासनाने जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली होती.त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि जुना राजवाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या दोन्ही कैद्यांच्या पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत.अशी अधिकृत माहीती वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.दरम्यान चार वाजता पत्रकार परिषद घेऊन जिल्हापोलीस अधीक्षक याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत असेही कळते.

बातम्या आणखी आहेत...