आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक:कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची तारीख जाहीर; भाजप निवडणूक लढवणार

कोल्‍हापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा नुकताच निकाल लागला आहे. असे असताना आता निवडणूक आयोगाने कोल्‍हापुरातील पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. येत्या 12 एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निमित्ताने आता कोल्हापुरात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्‍या निवडणूक कार्यक्रमानुसार 24 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 28 मार्च असणार आहे. तर 12 एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 16 एप्रिल रोजी निकाल जाहीर केला जाईल. कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांच्‍या अकाली निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. जाधव यांच्‍या श्रद्धांजली सभेत पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्‍छा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी बोलून दाखवली होती. मात्र या निवडणुकीत उमेदवार देणार अशी घोषणा भाजप प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि गत निवडणुकीत पराभूत झालेल्‍या राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारीसाठी प्रयत्‍न सुरू केले आहे. तर आम आदमी पक्ष आणि शेतकरी संघटनेचे बाळ नाईक यांनीही तयारी सुरू केली आहे. निवडणूक प्रामुख्याने दुरंगी होणार की तिरंगी याचा निर्णय क्षीरसागर निवडणुक लढवणार का नाही यावर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...