आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातील चप्पल स्टँड चालकाला एका ग्राहकाने चुकून 10 रुपयांऐवजी 8500 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले. ही चूक लक्षात येताच ग्राहकाने स्टँड चालकाकडे पैसे परत मागितले. मात्र, हे पैसे परत देण्याऐवजी स्टँड चालकाने चक्क कपडे काढत धिंगाणा घातला.
स्टँड चालकाविरोधात गुन्हा
शुक्रवारी घडलेली ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. विशेष म्हणजे ग्राहकाने याबाबत पोलिसांकडेही तक्रार केली. मात्र, स्टँड चालकाने पोलिसांसमोरही ग्राहकाला शिवीगाळ केली. याप्रकरणी स्टँड चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके घडले काय?
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बिहार राज्यातून एक दाम्पत्य देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी दाम्पत्याने आपली चप्पल मंदिर परिसरातील स्टँड चालक गणेश पाकरे यांच्याकडे सोपवली. दर्शनानंतर चप्पल घेऊन जात असताना दाम्पत्याने स्टँड चालकांना 10 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले. मात्र, याच वेळी या दाम्पत्याकडून चुकून 8500 रुपयांचा आणखी एक व्यवहार झाला व ते पैसेही स्टँड चालकाच्या बँक खात्यात गेले. ही चूक कळताच दाम्पत्याने स्टँड चालकाला पैसे पुन्हा देण्याची विनंती केली. मात्र, पैसे देण्याऐवजी चप्पल स्टँड चालकाने चांगलाच वाद घातला.
पोलिस स्टेशनमध्ये धिंगाणा
स्टँड चालक पैसे देण्यास तयार नसल्याने त्रस्त झालेल्या बिहारच्या या दाम्पत्याने थेट जुना राजवाडा पोलिस स्टेशन गाठत पोलिसांकडे मदत मागितली. यावेळी पोलीस ठाण्याचे अमलदार यांनी चप्पल स्टँड चालकाची चौकशी केली. त्यावेळीदेखील चप्पल स्टँड चालकाने पोलिसांशीही वादावादी केली. तसेच, पोलिसांसमोरच दाम्पत्याला शिवीगाळ सुरू केली. स्टँड चालकाला पोलिस ठाण्यात नेल्यावरही स्टँड चालकाने कपडे काढत धिंगाणा चालू ठेवला.
ही सर्व घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांच्या कामात अडथळा आणि दाम्पत्यास शिवीगाळ केल्या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चप्पल स्टँड चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.