आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरला महापुराचा धोका कायम:राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले, जिल्ह्यातील 23 गावांमधील नागरीकांचे स्थलांतर, शहरात पावसाची थोडी उघडीप

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. जिल्ह्यातील इतरही नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी धरण पूर्ण भरले असून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाने आजही शहरात पावसाने थोडीशी उघडीप दिली. पण पाणी पातळी गेल्या बारा तासात केवळ एक इंच घट झाली आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने महापुराचा धोका ओळखून जिल्हा प्रशासनाने पंचगंगा नदी पात्रा लगतच्या २३ गावांमधील १८७८ कुटुंबातील ५५६१ व्यक्तींचे स्थलांतर केले आहे.

पंचगंगा नदीने गुरुवारी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अद्यापही धोका पातळीवर वाहणाऱ्या पुराच्या पाण्याने नदीकाठचा परिसर व्यापला आहे. पुणे बेंगलोर महामार्गावरील पंचगंगा नदी पात्र भागातील महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर पाणी आले असून याठिकाचे औद्योगिक क्षेत्र, व्यवसाय बंद झाले आहेत. गतवर्षीच्या महापुराचा भयान अनुभव पाठीशी असल्याने प्रशासनासह नागरीकही सतर्क झाले आहेत. शहरासह जिल्ह्यात ज्या ज्या भागात पुराचे पाणी येते तेथील अनेक नागरीक स्वत: सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. शहराच्या मध्यावर असलेल्या शाहुपुरी कुंभार गल्ली गतवर्षीच्या महापुरात पूर्णत: बुडाली होती. येथील नागरिकांनाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

गतवर्षी शिरोळ तालुक्यातील सर्वाधिक गावांना महापुराचा फटका बसला होता. येथे एनडिआरएफ चे पथक दाखल झाले असून ज्या गावांमध्ये पुराचे पाणी येते तेथील परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात २३५.५८२ दलघमी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणामधून ७११२ तर अलमट्टी धरणातून १५०००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प व जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

महागड्या चारचाकींच्या रांगा

गतवर्षी शहराच्या मध्यावर ज्या ज्या भागात पुराचे पाणी शिरले होते. तेथील नागरीकांचे अतोनात नुकसान झाले होते. अनेकांच्या चारचाकी महागड्या गाड्या पुराच्या पाण्यात राहून खराब झाल्या. इन्शुरन्स कंपनीकडून काही नुकसान भरपाई मिळाली नाही. यावर्षी पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्या बरोबर नागरीकांनी शहरात ज्या भागात पुराचे पाणी येत नाही अशा ठिकाणी गाडल्या पार्क केलेल्या आहेत. जवळपास तीन किलोमीटर अंतरावर या गाड्या लावल्या आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 72.42 दलघमी, वारणा 822.65 दलघमी, दूधगंगा 596.12 दलघमी, कासारी 69.91 दलघमी, कडवी 56.79 दलघमी, कुंभी 63.14 दलघमी, पाटगाव 92.14 दलघमी, चिकोत्रा 26.73 दलघमी, चित्री 42.74 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.

बातम्या आणखी आहेत...