आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूरचा शाही दसरा:शंभर वर्षांनी यंदा साधेपणाने झाला शाही दसरा, दसराचौका ऐवजी भवानी मंडपातील अंबा चौकात पार पडला सोहळा; पाहा व्हिडिओ

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शंभर वर्षांपूर्वी प्लेगची साथ आल्याने साधेपणाने साजरा झाला होता शाही दसरा

कोल्हापूरचा शाही दसरा यंदा साधेपणाने साजरा करण्यात आला. शंभर वर्षांनी पुन्हा एकदा साथीच्या आजारामुळे शाही दसरा सार्वजनिकरित्या साजरा न होता साधेपणाने साजरा झाला. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा भव्य प्रमाणात साजरा न करण्याचा निर्णय श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी घेतला होता. यंदा परंपरा खंडीत न करता जुन्या राजवाड्यातील अंबा चौकात शमी पूजन सोहळा (सोनं लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम) पार पडला.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, श्रीमंत युवराज खासदार संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, श्रीमंत युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती, श्रीमंत राजकुमार यशराजे छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन करण्यात आले.

कोल्हापूरमध्ये 1899 ते 1900 च्या दरम्यान प्लेगची साथ आली होती. त्यावेळी या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करुन दसरा सार्वजनिक रित्या न करता साधेपणाने केला होता. तसेच नागरीकांना घराबाहेर न पडण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर शंभर वर्षांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या सहभागाशिवाय दसरा साजरा करण्यात आला.

दरम्यान, दरवर्षी ऐतिहासिक दसरा चौकात छत्रपती घराण्यातील वंशजाच्या हस्ते पंरपरेनुसार शमीपूजन केले जाते. त्यानंतर तोफेची सलामी झाल्यानंतरच आपट्याची पाने लुटण्याचा म्हणजे सोनं लुटण्याचा कार्यक्रम होतो. या सोहळ्यासाठी दसरा चौकात हजारो नागरिक उपस्थित असतात. यंदा मात्र ऐन दसर्या दिवशी ऐतिहासिक दसरा चौकाने शांतता अनुभवली.

दसर्यानिमित्त देवी रथारुढ होऊन सिमोल्लंघनाला चालल्याची पूजा

अश्र्विन शुद्ध नवमी युक्त दशमी अर्थात दसर्याच्या दिवशी परंपरेला अनुसरून करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई सिमोल्लंघनाला जात असते. त्याची स्मृती म्हणून करवीर निवासिनीची रथारूढ पूजा बांधली जाते. परंपरेनुसार देवीची रथारुढ पूजा बांधण्यात आली होती.

दसरा आणि मेबॅक कारचा शाही थाट....

1936 मध्ये राजाराम महाराजांनी जर्मनीतून मेबॅक कार मागवली होती. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे देशभरात असलेल्या 4 कारपैकी ही एक कार आजही छत्रपती घराण्याने जपून ठेवली आहे. सद्यस्थितीत कार चालू अवस्थेत आहे. या गाडीच्या समोर करवीर संस्थानचा भगवा ध्वज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी तलवार देतानाचा तांब्याचा लोगो आहे. राजाराम महाराजांनी ही गाडी घरात वापरण्यासाठी मागवलेली होती. पुढे 1986 पासून याच गाडीतून छत्रपती घराण्यातील वंशज दसरा चौकात येतात. वर्षभरात एकदाच कोल्हापूरकरांना ही गाडी पाहण्याची संधी असते. पण यंदा मात्र नाही दसर्यात मेबॅकही दिसली नाही.