आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 129 ठार:अनेक जागी दरड-भूस्खलन; सह्याद्रीच्या कुशीतील महाडच्या तळियेत 35 घरे ढिगाऱ्यात गडप, 38 मृतदेह हाती

रायगड/सातारा / विवेक ताम्हणकर, विजय मांडके3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधी महाराष्ट्रावर आभाळ कोसळले अन् आता दरडी. आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात हाहाकार उडाला. रायगड, रत्नागिरी व साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांत दरडी कोसळल्या, भूस्खलन झाले तसेच इतर दुर्घटना घडल्या. गेल्या ४८ तासांत सुमारे १२९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. दुर्गम भाग व पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळिये गावात गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दरड कोसळून ३० ते ३५ घरे गडप झाली. यात ३८ जणांचा मृत्यू झाला. आणखी ८० ते ८५ जण ढिगाऱ्यांत अडकल्याची शक्यता बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. शुक्रवारी बचावकार्य सुरू झाल्यानंतर घटनेची भीषणता समोर आली. गावात एक मोठा धबधबा असून त्याशेजारची जागा भरावासाठी खोदण्यात आली होती. त्यामुळे दरड कोसळल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, चिपळूण तालुक्यातील पोसरे-बौद्धवाडीत दरड कोसळल्यामुळे १७ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पाेलादपूर तालुक्यातील केवनाळे व सुतारवाडी येथे दरडीखाली ११ जणांचा मृत्यू झाला. खेडच्या धामणंदमध्ये १७ घरांवर दरड कोसळून काही कुटुंबे अडकली. सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाईच्या कोंडवळी व मोजेझोर येथेही दरडी कोसळून एकूण २७ जण ठार झाले.

तळियेत धबधब्याजवळची जागा भरावासाठी खोदली होती, त्यामुळेच...
तळियेत धबधब्याजवळची जागा भरावासाठी खोदली होती, त्यामुळेच...

सातारा जिल्ह्यात हाहाकार; दरडी कोसळून २७ जण ठार
सातारा | सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी भूस्खलन झाले आहे. यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. २७ नागरिकांची सुटका करण्यात यश आले आहे. पुणे विभागात तब्बल ८४,४५२ जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

महापुरामुळे व्हेंटिलेटर बंद;१० कोरोना रुग्ण दगावले
रायगड | चिपळूणच्या दोन रुग्णालयांत पुराचा लोंढा शिरल्याने व्हेंटिलेटरवरील १० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपरांत हॉस्पिटलमध्ये २१ पैकी काही रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. हॉस्पिटलमध्ये पुराचे पाणी व चिखल शिरल्याने वीजपुरवठा खंडित झाला. जनरेटरमध्येही पाणी झाल्याने ते सुरू होऊ शकले नाही. यामुळे व्हेंटिलेअर बंद पडून ८ रुग्ण दगावले. तसेच दुसऱ्या कोविड सेंटरमधील दोन रुग्णांचाही मृत्यू झाला.

एनडीआरएफची २६ पथके
चिपळूण येथे लष्कराची तुकडी दाखल झाली. एनडीआरएफची २६ पथके, हवाई दलाची चार हेलिकॉप्टर मदतकार्यात तैनात आहे. एनडीआरएफची ४ पथके रत्नागिरीत, कोल्हापुरात ३, मुंबई, रायगड, ठाण्यात प्रत्येकी २, तर सातारा, नागपूर, पालघर, सांगली व पुण्यात प्रत्येकी १ चमू.

राज्य आणि केंद्राकडून मदत
दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. पंतप्रधानांनीही दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली.

सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट : हवामान खात्याने ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा समावेश आहे. येथे २४ तासांत किमान २०४.४ मिमी पावसाची शक्यता आहे.

- आंबेघर : गावाजवळ डोंगराचा भाग कोसळून १४ लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
- मिरजगाव : डोंगराचा कडा कोसळून १२ जण गडप झाले.
- जावली : रेंगडी गावामध्ये २ महिला ओढ्याच्या पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता तर दोन जण ठार झाले.
- वाई : कोंढवळेत ५ घरे कोसळली. यात २ मृत्यू तर, २७ जखमी झाले.
- केवनाळे व सुतारवाडी येथे दरड काेसळून ११ जणांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...