आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • Liquor Shops And Malls Can Be Opened In Maharashtra, So What Is The Problem In Opening Religious Places? Question From Leader Of Opposition Devendra Fadnavis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदिरे उघडण्याची मागणी:माताेश्रीतून चालणारे अजब सरकार, दारू दुकानांसाठी धावाधाव; मंदिरांबाबत टाळाटाळ फडणवीसांची टीका

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठीच केंद्र शासनाकडे बोट, फडणवीसांची टीका

देशात अन्यत्र लॉकडाऊन उघडल्यानंतर तेथील धार्मिक स्थळे खुली करण्यात आली. त्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढला अशा घटना नाहीत. मग महाराष्ट्रातच धार्मिक स्थळे खुली का केली जात नाहीत. एकीकडे दारू दुकाने उघडली जातात, तर दुसरीकडे धार्मिक स्थळे उघडू दिली जात नाहीत याचा अर्थ समजत नाही अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी कोल्हापुरातील कोरोना स्थितीचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या सोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे व समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.

धार्मिक स्थळांबाबत केंद्र सरकारने सुट दिली आहे. त्याला महिना होत आला. त्यानुसार देशातील इतर राज्यांच्या ठिकाणी धार्मिक स्थळे खुली झाली. परंतु महाराष्ट्रात अद्याप नाहीत. राज्यात दारुची दुकाने, मॉल्स उघडू शकतात तर मग धार्मिक स्थळे उघडायला काय अडचण आहे? जनतेत जागृती झाली आहे. सामाजिक अंतर पाळून मंदिरे सुरू करता येऊ शकतात. राज्यात दारु दुकानापेक्षा धार्मिक स्थळे उघडून आध्यत्मिक वातावरण तयार झाले तर त्याचा जास्त फायदा होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

कर्नाटकातील अलमट्टीबाबत धरणाबाबत महाराष्ट्र सरकारने कडक भूमिका घ्यावी

कर्नाटकात अलमट्टी धरण बांधले जात असताना महाराष्ट्र सरकारने त्यावेळी कडक भूमिका घेतली नाही म्हणूनच आज कोल्हापूर आणि सांगली जिल्हा अलमट्टीमुळे प्रत्येक पावसाळ्यात पाण्याखाली जातो.परंतु आता अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय खपवून घेवू नये याबाबत कडक भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरात सांगितले.

अकार्यक्षमता लपवण्यासाठीच केंद्र शासनाकडे बोट

राज्य शासनातील अनेक मंत्री उठसुठ केंद्रीय शासनाकडे बोट दाखवतात. आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठीच ते केंद्र शासनाकडे बोट दाखवतात, अशी टीका फडणवीस यांनी केली. प्रत्येक गोष्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणून आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठीचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे. वास्तविक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांनी समजून घ्यावे की, आपली लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नाही, तर कोरोना विरुद्ध आहे. वास्तविक पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्राला सर्वात जास्त मदत करत आहेत. पीएम केअर फंडातून महाराष्ट्रला सर्वाधिक मदत मिळाली असल्याचेही फडणवीस म्हणाले.

कोरोना रुग्णांचा मृत्यू दर देशात सर्वाधिक कोल्हापूरात

कोल्हापूरातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. मोठ्याप्रमाणात कोरोना टेस्ट वाढवल्या तर संसर्ग रोखता येईल. आयसीएमआरच्या गाईडलाईन नुसार 5 टक्के संसर्ग व 1 टक्के मृत्यू दर सांगितले जाते. मात्र त्या तुलनेत कोल्हापूरातील आकडेवारी भयानक आहे. सद्य स्थितीत कोल्हापूरातील संसर्गाचा आकडा 25 टक्के तर मृत्यू दर 3 टक्क्यावर गेला आहे. ही आकडेवारी देशातील मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. तर राज्याच्या तुलनेत बरोबरीला आहे. ही आकडेवारी नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविलेल्या 400 ऑक्सिजन बेड वर 300 आयसीयू बेडच्या प्रस्तावास शासनाने तत्काळ मंजुरी द्यावी, अन्यथा कोल्हापूरवरील कोरोनाचे संकट आणखी गडद होईल अशी भितीही फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच कोल्हापूरवरील कोरोनाच्या संकटाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटून विनंती करणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.