आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर:महालक्ष्मीचा शारदीय नवरात्रोत्सव यंदा ऑनलाईनच;कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा

कोल्हापूर13 दिवसांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
           नवरात्रोत्सवाच्या आदल्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची अशी पूजा बांधण्यात आली होती.
  • कुंडलिनी, महालक्ष्म्यअष्टक, सरस्वती स्तवन रुपात दिसणार महालक्ष्मी

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी/ अंबाबाईचा नवरात्रोत्सव म्हणजे चैतन्याचा झरा. नऊ दिवसांतील देवीची विविध रुपे, सजलेले मंदिर, भक्तीने ओसंडून वाहणारा मंदिरातील तिचा दरबार यंदा मात्र कोरोनामुळे प्रथमच सूना असेल. पण भक्तीने ओत:प्रोत भरलेल्या नजरेत देवीचे चैतन्यदायी रुप सामावणार आहे. कारण देवीभक्तांसाठी नवरात्रोत्सवाचा संपूर्ण सोहळा ऑनलाईन करण्यात आला असून लाईव्ह दर्शन अॅपच्या माध्यमातून नित्यपूजा, आरती, पालखी सगळे घरबसल्या पाहता येणार आहे.

महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर स्वच्छता, गाभारा स्वच्छता इतकेच काय पालखीपासून ते नऊ दिवस तिच्या श्रृंगारासाठी लागणार्या मौल्यवान दागिन्यांपर्यंत सगळी तयारी झाली आहे. उणीव आहे ती भक्तांची.

तिच्या दर्शनाची आस बाळगून असलेल्या लाखों भक्तांच्या पदरी निराशा आली असली तरी ऑनलाईन दर्शनाच्या सुविधेने ती दुर होणार आहे. पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अंबाबाई भक्तांसाठी कायमस्वरुपी लाईव्ह दर्शन अॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून जगभरातील देवीभक्त दर्शन घेऊ शकणार आहेत. यंदा प्रथमच नवरात्रोत्सवात नऊ दिवस मंदिर बंद असेल. नऊ दिवसातील सगळे धार्मिक विधी परंपरेनुसार होतील. केवळ पालखीला भाविक नसतील.

भाविकांना अंबाबाईचे दर्शन घरबसल्या घेता यावे यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने लाईव्ह दर्शन अॅप सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अॅपद्वारे मंदिरातील देवीच्या गाभार्याचे दरवाजे उघडल्यापासून रात्री बंद होईपर्यंत देवीचे लाईव्ह दर्शन घेता येते. देवीची आरती, अलंकार पूजा व दिवसभरात चालणारे सर्व धार्मिक विधी पाहता येतात. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अॅप डाऊनलोड करता येते.

Hey check out our Ambabai Live Darshan app at: https://play.google.com/store/apps/details?id=com.smac.ambabailive

शारदीय नवरात्रोत्सवात श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीची नऊ दिवस विविध रुपातील बांधण्यात येणाऱ्या पुजा आणि या नऊ दिवसात देवीला नेसवण्यात येणाऱ्या साड्यांचे रंग असे....

दि.१७ - शनिवार- कुण्डलिनी स्वरुपात (साडीचा रंग लाल)

दि.१८ - रविवार- पराशरकृत सर्वसंशयहर श्रीमहालक्ष्म्यष्टक (साडीचा रंग पितांबरी)

दि.१९- सोमवार- नागकृत महालक्ष्मी स्तवन (साडीचा रंग केशरी)

दि. २०- मंगळवार- सनत्कुमार महालक्ष्मी सहस्त्रनाम (साडीचा रंग निळा/जांभळा)

दि.२१- बुधवार- गजारुढ अंबारीतील पूजा (साडीचा रंग लाल )

दि. २२- गुरुवार- श्रीशिवकृत महालक्ष्मी स्तुती (साडीचा रंग पांढरा )

दि. २३- शुक्रवार- अगस्त्यकृत सरस्वती स्तवन (साडीचा रंग पिवळा )

दि. २४- शनिवार- महिषासुरमर्दिनी (साडीचा रंग लाल )

दि. २५- रविवार- अश्वारुढ - शालू