आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कळवळला:राज्यात पूरग्रस्त भागात 112 मृत्यू, 99 बेपत्ता, 1 लाख लोकांचे स्थलांतर; तळिये गावात 49 मृतदेह बाहेर काढले

रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापुरातील आंबेवाडी आणि चिखली गावाला महापुराचा सर्वात जास्त फटका बसतो. गावातील एका कुटुंबाने दुमजली इमारतीत नातेवाइकांकडे आसरा घेतला होता. लाइट बंद, पाणी नाही, दूध नाही. फक्त बिस्किटे खायला घालून एका वर्षाच्या बाळासह या कुटुंबाने रात्र जागून काढली. शनिवारी एनडीआरएफच्या जवानांनी बाळासह त्याच्या घरच्यांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. - Divya Marathi
कोल्हापुरातील आंबेवाडी आणि चिखली गावाला महापुराचा सर्वात जास्त फटका बसतो. गावातील एका कुटुंबाने दुमजली इमारतीत नातेवाइकांकडे आसरा घेतला होता. लाइट बंद, पाणी नाही, दूध नाही. फक्त बिस्किटे खायला घालून एका वर्षाच्या बाळासह या कुटुंबाने रात्र जागून काढली. शनिवारी एनडीआरएफच्या जवानांनी बाळासह त्याच्या घरच्यांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.

नवीन घर बांधलं होत. पण दरड कोसळताच एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आता शेतात राहतोय, अन्नाचा कणही शिल्लक नाही, अशा शब्दांत रायगड जिल्ह्यातील तळिये गावातील बबन सकपाळ यांनी आपली व्यथा कथन केली. दरड कोसळून आता ७२ तासांपेक्षाही अधिक कालावधी उलटून गेलाय. अद्यापही मातीचे ढिगारे उपसण्याचे काम सुरूच आहे. शेकडो घरे उद्ध्वस्त झाली. एकूण ८५ पैकी जण दबले असून त्यापैकी ४९ मृतदेह काढण्यात यश आले आहे. ३६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. ३३ मृतदेहांची ओळख पटली आहे. तळियेपाठोपाठ शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथे डोंगर कोसळून एक युवक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

‘दिव्य मराठी’चे सरकारला प्रश्न
१. हवामान विभागाने अतिवृष्टीचे पूर्वानुमान वर्तवले असतानाही आपत्तीनंतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यास आणि मदतकार्य सुरू होण्यात एवढी दिरंगाई का झाली?
२. इशारा मिळूनही एनडीआरएफची वाढीव पथके तैनात करण्यासाठी वेळीच केंद्रीय यंत्रणांशी समन्वय का केला गेला नाही ?
३. एनडीआरएफच्या धर्तीवर राज्याची एसडीआरएफ कार्यान्वित करण्याच्या निर्णयाचे घोडे नेमके कुठे अडले आहे ?

सातारा : आंबेघर दुर्घटनेतील १५ मृतदेह बाहेर काढले
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात तीन गावांमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आंबेघर गावात १५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मिरगावात अद्यापही ११ तर ढोकावळे येथे सुमारे ५ जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या ठिकाणीही एनडीआरएफचे पथकाकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाला असून कोयना धरणातून पाण्याचा िवसर्गही घटवण्यात आला. धरणाचे दरवाजेही बारा फुटांवरून साडेपाच फुटांपर्यंत खाली आणण्यात आले आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत २२ बळी गेले असून २० जण बेपत्ता तर ३ हजार ३४ जनावरे दगावली आहेत. शुक्रवारी दिवसभर एनडीआरएफसी टीम दुर्घटनाग्रस्त भागात पोहोचू शकली नव्हती. शनिवारी सकाळी ही टीम पोहोचल्यानंतर मदत व बचावकार्यास सुरुवात झाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित झाली असून जिल्ह्यातील एकूण १ हजार ३२४ कुटुंबांतील ५ हजार ६५६ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा, आम्ही सर्वांना मदत करू : उद्धव ठाकरे
तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा, आम्ही सर्वांना मदत करू : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी दिला तळिये गावकऱ्यांना धीर
महाड तालुक्यातील तळिये गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शनिवारी भेट दिली. या वेळी ‘तुमच्यावर कोसळलेला हा प्रसंग मोठा आहे. त्यामुळं तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल,’ असा गावकऱ्यांना धीर दिला. नंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, डोंगरउतार आणि कडेकपारीत राहणाऱ्या वाड्या- वस्त्या यांना स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे सांगून पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा नद्यांचे पाणी पावसाळ्यात वाढून पूरस्थिती उद्भवते. यावर तोडगा मार्ग काढण्यासाठी जल आराखडा तयार केला जाईल.

कोकणातील भूमिगत तारांसाठी १९०० कोटींची तरतूद करणार
नाशिक | कोकणात वारंवार उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे वीजपुरवठा खंडित होणे व त्यामुळे संपर्क तुटल्याने मदत कार्यात अडथळे येतात. त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कोकणात वीज तारा भूमिगत लावण्यासाठी १९०० कोटींची तरतूद करण्यात येईल. तसेच कायमस्वरूपी स्थलांतराबाबत नवे पुनर्वसन धोरण तयार करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

सांगली शहराला पाण्याने वेढले, कोल्हापुरात पूर
तीन दिवसांनंतर पावसाने दिलेली उघडीप आणि कोयना, वारणा धरणातील विसर्ग कमी झाल्याने सांगलीवरील पुराचा धोका तूर्तास टळला आहे. मात्र कृष्णा नदीची पातळी ५२ फुटांवर गेल्याने शहरातील मुख्य बाजारपेठ आणि नागरी वस्तीत पाणी घुसले आहे. जवळपास १६ हजार कुटुंबे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाली आहेत. ५७ रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली आहे. कोल्हापुरात गेले तीन दिवस कोल्हापूरला झोडपून काढणाऱ्या पावसाने अखेर शुक्रवारी मध्यरात्रीपासून उसंत घेतली. अतिवृष्टी थांबल्याने पूर ओसरू लागला आहे. तरीही अद्याप पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने महापुराची स्थिती गंभीर आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यात ५ बळी घेतले आहेत. शहरात जिल्हाधिकारी कार्यालयास पाण्याचा वेढा पडला आहे.

रायगडातील तळिये गावात 49 मृतदेह बाहेर काढले
राज्यात ५३ जखमी :
राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पूरग्रस्त भागातून सुमारे एक हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण ११२ मृत्यू झाले असून ३,२२१ जनावरे दगावली आहेत. एकूण ५३ लोक जखमी असून ९९ लोक बेपत्ता आहेत तर १,३५,३१३ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...