आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेल्हापूरला वेढा:परिस्थिती भयाण; महापुराचे पाणी घराघरांत शिरले, लाखोंचे नुकसान, इंद्रायणीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक ठिकाणी झाडे कोसळली

कोल्हापूर / प्रिया सरीकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार उडाला आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. संपूर्ण कोल्हापूरला चोहोबाजूंनी महापुराचा वेढा पडला आहे. महापुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोल्हापूर शहरातील नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने शेकडो नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले. महापुराच्या विळख्यात अनेक गावे सापडल्याने हजारो नागरिक स्थलांतरित झाले आहेत.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन, दरड कोसळून अनेक मार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. वेदगंगा नदीचे पाणी महामार्गावर आल्याने महामार्ग बंद झाला असून वाहतूक ठप्प झाली आहे. पन्हाळ्यावरील रस्ता खचला आहे तर गारगोटी-उत्तूर मार्गा पांगिरे येथे खासगी वाहून गेली आहे. चिखली आणि आंबेवाडी या गावातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सध्या बचाव पथकाकडून केले जात आहे. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने बचावकार्य वेगाने राबवले जात आहे.२०१९ च्या महापुरामध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या आंबेवाडी आणि प्रयाग चिखली गावातील नागरिकांना या वर्षीही महापुराचा फटका बसला आहे. दोन्ही गावांतून प्रयत्नातून तेथील ११ प्रवाशांना बाहेर काढून सुखरूप ठिकाणी नेले.

- कोल्हापूर जिल्ह्याची पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीची पाणीपातळी ५४ फूट १० इंचांवर पोहोचली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जिल्ह्यातील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. शहर, जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांतील अनेक कुटुंबांनी स्थंलातर केले आहे.

- कोल्हापूर-पन्हाळा महामार्गावरून नाशिकला जाणाऱ्या बसेसमधील ३६ प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आले. यातील भूदरगड येथील बस वाहून गेली आहे. चिकोत्रा नदीच्या पात्रात आराम बस नदीपात्रात अडकली. येथे भूदरगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पोलिसांच्या मदतीने नागरिकांना बाहेर काढले.

बस पाण्यात अडकली, २५ जण बाहेर काढले, नंतर बसच बुडाली

- कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर, रत्नागिरीला निघालेली कर्नाटक राज्य परिवहनची बस राजपूतवाडीजवळ पाण्यात अडकली होती. बसमधील पुरुष, महिला व लहान मुले अशा एकूण २५ लोकांना सहीसलामत बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांना यश आले आहे. त्यानंतर ही बस पाण्यात बुडाली.

पुणे-बंगळुरू महामार्ग बंद
- कोल्हापूर-गारगोटी-गडहिंग्लज, गारगोटी-कडगाव हे सर्व मार्ग बंद झाले. गारगोटीचा कोल्हापूर पुणे-बंगळुरू महामार्ग बंद

- सांगली-कोल्हापूर बायपास रोडवर उदगाव येथील ओढ्याला बॅकवॉटरमुळे पुराचे पाणी आले असून पुलावर चार फूट पाणी आले. बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे.

- जिल्ह्यात पुराचा वेढा पडल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बऱ्याच भागातील रस्ते बंद असून विद्युत पुरवठा व दूरध्वनी यंत्रणा खंडित झाली आहे..

- पुणे-बंगळुरू एनएच-४ हायवेलगत असलेला सांगली फाटा ते कोल्हापूरकडे जाणारा सर्व्हिस रोड व बंगळुरू-पुणेकडून शिरोलीकडे जाणारा सर्व्हिस रोड ३-४ फूट रोडवर पाणी असल्याने बंद करण्यात आलेले आहेत.

- सांगली फाटा ते सांगली जाणारे शिरोली जुन्या नाक्याजवळ मार्बल लाइन येथे रोडवर पाणी साचल्याने सदरचा रस्ता बंद असून एकेरी वाहतूक सुरू आहे.

- कोल्हापूर ते पुणे महामार्गावरील सांगली फाटा इथे महापुराचे पाणी आल्याने, कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर पुण्याहून कोल्हापूरकडे येणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक पोलिस प्रशासनाने सुरू केली आहे.

सांगली : कृष्णा, वारणा, दूधगंगा, येरळा पात्राबाहेर
गणेश जोशी| सांगली

आभाळ फाटलं असा भास व्हावा, अशी पर्जन्यवृष्टी दक्षिण महाराष्ट्रात सुरू असल्याने शुक्रवारी सांगली जिल्ह्याचा कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांशी संपर्क तुटल्याने जनजीवन ठप्प झाले. तसेच कोयना धरणाच्या परिसरातील नवाजा येथे गुरुवारी रात्री तीन वाजेपर्यंत विक्रमी ७३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आणि कोयनेच्या इतिहासात प्रथमच केवळ आठ तासांत १८ टीएमसी पाणीसाठा वाढल्याने कोयनेसह कृष्णा खोऱ्यात सर्व धरणांतील पाण्याचा विसर्ग सुमारे १ लाख क्युसेकने सुरू करण्यात आल्याने सांगलीत कृष्णेची पातळी ४३ फुटांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत कृष्णा ५० फुटांनी वाहण्याची शक्यता जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी व्यक्त केली.

कृष्णा, वारणा, दूधगंगा, येरळा या प्रमुख नद्यांसह अनेक उपनद्या पात्राबाहेर वाहू लागल्याने सांगली जिल्ह्यातील अनेक गावे विस्थापित झाली आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ३० हजार हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. उद्या कृष्णेची पातळी ५० फुटांपर्यंत पोहोचल्यानंतर सुमारे ४० गावांतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाला अथक प्रयत्न करावे लागणार आहेत. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १२ फूट वर उचलल्याने कोयना नदीपात्रात ५४५४१ क्युसेक पाणी प्रतिसेकंद सोडण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोमबलकवडी, मोरणा गुरेघर या धरणांतूनही नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने कोयना, कृष्णा, उरमोडी, तारळी, वेण्णा, नीरा नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे.

सातारा : कोयनेचे सहा वक्र दरवाजे १२ फूट वर उचलले
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १२ फूट वर उचलल्याने कोयना नदीपात्रात ५४५४१ क्युसेक पाणी प्रतिसेकंद सोडण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोमबलकवडी, मोरणा गुरेघर या धरणांतूनही नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने कोयना, कृष्णा, उरमोडी, तारळी, वेण्णा, नीरा नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे.

बातम्या आणखी आहेत...