आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाकरे सरकार कोसळण्याच्या मार्गावर आलेलं असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापासून मी पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचं विधान केलं आहे. राज्यातील घडामोडींशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यातलं सरकार कोसळू शकतं अशा परिस्थितीत तुम्ही कोल्हापुरात आलात या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला त्यातलं काहीच माहिती नाही, मी आज सकाळी घरी आलो आहे, बरेच दिवस घरी आलो नव्हतो. माझं पक्षाचं रुटीन काम चालू आहे. राज्यात जे काही सत्ताबदलाचं चाललं आहे, त्याची मला काही जाणीव नाही.
फडणवीस दिल्लीला गेल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, फडणवीसांचं दिल्लीला जाणं रुटीन आहे. पक्षाची अनेक कामंही असतात. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घ्याव्या लागतात. काल आम्ही दुपारी एकत्र जेवलोही. आणि तेव्हा त्यांना मी कोल्हापुरात येत असल्याची कप्लना दिली, असेही ते म्हणाले.
राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही
एकनाथ शिंदे यांनी काल एक राष्ट्रीय पक्ष आमच्यासोबत असल्याचं म्हटलं या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, हा राष्ट्रीय पक्ष कोणता ते आम्हाला माहिती नाही, देशात राष्ट्रीय पक्ष खूप आहेत. त्यांना नेमका कोणता राष्ट्रीय पक्ष म्हणायचं आहे हे त्यांनाच विचारावं लागेल. ते सध्या लगेच उपलब्ध नाहीत.
पाटील असेही म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या घटनांमध्ये भाजपचा कुठलाही हात नाही. भाजप आपलं रुटीन काम करतंय. 16 मतदारसंघ असे काढले आहेत जेथे लक्ष केंद्रित करायचे आहेत. यामुळे राज्यातल्या या घटनांशी आमचा काहीही संबंध नाही.
संजय राऊतांना जरा जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य
शरद पवार म्हणतात की, या पाठीमागे भाजपचाच हात आहे, त्यांनी राष्ट्रीय पक्षांची यादीही दाखवली यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले की, या देशात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि ते पवार साहेबांना आणि संजय राऊतांना जरा जास्त आहे. त्यांना त्यामुळे काहीही म्हणता येतं. मला पवार काय म्हणाले आणि राणे साहेब काय म्हणाले तेही माहिती नाही, असेही पाटील म्हणाले.
भाजपची भूमिका राज्याचा अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो. पण आमच्या नेत्यांना एखाद्याला उत्तर देण्याचेही अधिकार आहेत. पाटील असेही म्हणाले की, गेलेत कोण, आलेत कोण, काय चाललंय यापासून मी पूर्ण अनभिज्ञ आहे.
मोहित कंबोज सगळ्यांचेच मित्र
भाजपचे मोहित कंबोज सुरतमध्ये होते आता गुवाहाटीत कसे या प्रश्नावर पाटील म्हणाले की, मोहित कंबोज हे सगळ्यांचेच मित्र आहेत. ते जसे भाजपचे नेते, कार्यकर्ते आहेत तसेच ते एकनाथ शिंदेंचेही मित्र आहेत. त्यामुळे शिंदेंनी त्यांना बोलावलं असेल, सांगता येत नाही.
राऊत सकाळी एक बोलतात, दुपारी वेगळंच
संजय राऊतांना सकाळी जे म्हणायचं असतं, ते दुपारी म्हणतील याची गॅरंटी नसते. आम्हाला अद्याप सत्ता स्थापनेचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, आमच्याकडे प्रस्ताव आल्यानंतर 13 जणांची कोअर कमिटी बसते, खल करते. त्यानंतर एकमत करून केंद्राला पाठवते. केंद्राचं संसदीय मंडळ अशा गोष्टींवर निर्णय घेते. अद्याप प्रस्तावच आलेला नाही, त्यामुळे आम्ही यावर आता काय बोलणार, असेही ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.