आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडिया आणि मोबाईलच्या आहारी जाण्यापासून मुलांना रोखणे हे पालकांसाठी प्रचंड आव्हानात्मक बनले आहे. मात्र, सांगलीतील एका गावाने यावर अनोखा तोडगा शोधून काढला आहे.
मुलांच्या डिजिटल डिटॉक्सिंगसाठी गावातील एका मंदिरातून दर सायंकाळी 7 वाजता सायरन वाजवले जाते. हे सायरन वाजताच ग्रामस्थ आपले मोबाईल फोन, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रिक गॅजेट्स बंद करुन टाकतात. वडगाव येथील ग्रामस्थ हा अनोखा उपक्रम राबवत आहेत. गावातील जवळपास सर्वच्या सर्व 3, 105 नागरिक हा उपक्रम हिरीरीने पाळत आहेत.
सायरन वाजला की, लोकांनी पुस्तक वाचनात किंवा एकमेकांशी चर्चा करण्यात वेळ घालवावा, अशी ही संकल्पना आहे. सायंकाळी 7 वाजता पहिला सायरन वाजतो. तर, रात्री 8.30 वाजता दुसरा सायरन वाजतो. दुसरा सायरन म्हणजे डिटॉक्स कालावधी संपला, अशी घोषणा असते. आबाल-वृद्धांसह सर्वच यामध्ये उत्साहाने सहभागी होतात. रविवारीदेखील हा उपक्रम राबवला जातो.
लॉकडाऊनमध्ये मोबाईलचे व्यसन वाढले
वडगावचे सरपंच विजय मोहिते यांच्या डोक्यातून ही भन्नाट कल्पना समोर आली आहे. या उपक्रमाबाबत त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या. ऑनलाइन क्लाससाठी मुलांच्या हातात मोबाईल आला. मात्र, वर्ग संपल्यावरही मुले मोबाईल सोडत नव्हते. पालकांचेही टीव्ही पाहण्याचे तास वाढले. लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा पुन्हा ऑफलाइन पद्धतीने सुरु झाल्या. मात्र, तेव्हा मुले घरात बसून बसून आळशी झाल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. मुलांची लिहिण्या-वाचण्याची आवड नाहीसी झाली होती. त्यांचा बराचसा वेळ फक्त मोबाईलवर जात होता. दुसरे म्हणजे गावात स्वतंत्र अभ्यासिका नव्हती. त्यामुळे मी प्रत्येकाला डिजिटल डिटॉक्सचा प्रस्ताव दिला.
स्वातंत्र्यदिनी उपक्रमाला सुरवात
सरपंच मोहिते यांनी सांगितले की, स्वातंत्र्यदिनी आम्ही महिलांची ग्रामसभा बोलावून सायरन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि सेवानिवृत्त शिक्षकांनी घरोघरी जाऊन डिजिटल डिटॉक्सबाबत जनजागृती केली.
मोहिते यांनी सांगितले की, हे गाव स्वातंत्र्यसैनिकांचे माहेर आहे. आमच्या गावाला राज्य आणि केंद्र सरकारकडून स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळाले आहेत. सध्या, संध्याकाळी 7 ते 8.30 च्या दरम्यान लोक त्यांचे मोबाईल फोन बाजूला ठेवतात, दूरदर्शन संच बंद करतात आणि वाचन, लेखन आणि बोलण्यावर लक्ष केंद्रित करतात. हा उपक्रम राबविण्यात येत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रभागनिहाय समिती स्थापन करण्यात आली आहे.
उपक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती
हा अनोखा उपक्रम गावातील विद्यार्थ्यांच्याही पसंतीला उतरत आहे. गायत्री निकम या दहावीच्या विद्यार्थिनीने या उपक्रमाचे कौतुक केले. गायत्रीने सांगितले की, लॉकडाऊनदरम्यान अनेक मुल फोन आणि टेलिव्हिजनच्या आहारी गेले होते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही त्यांचे पुस्तकांकडे लक्ष जात नव्हते. मात्र, आता सर्वांचे अभ्यासात मन रमत आहे.
गावातील एका व्यक्तीने सांगितले की, गावातील महिला दिवसातील बराचसा वेळ फक्त टीव्हीवर मालिकाच पाहत असे. या काळात मुले पालकांच्या देखरेखीपासून दूर जात असत. पण आता मुले संध्याकाळी 7 ते 8.30 पर्यंत अभ्यास करतात. या काळात पालकही त्यांना मदत करतात.
मध्य प्रदेशातही उपक्रम
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातदेखील 'डिजिटल उपवास' हा उपक्रम राबवण्यात आला. जैन समाजातील काही सदस्यांनी पर्युषण सणादरम्यान 24 तास डिजिटल उपवास पाळला. यादरम्यान त्यांनी स्मार्टफोन आणि आपले इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बंद ठेवले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.