आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना काय फायदा?:अजित पवारांनीच विरोध केला अन्यथा पेट्रोल 30 रुपयांनी स्वस्त झाले असते; महाराष्ट्र बंदचा शेतकऱ्यांना काय फायदा? चंद्रकांत पाटलांचा सवाल

कोल्हापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किमतींवर नागरिक त्रस्त आहेत. कधीचीच शंभरी पार केलेल्या पेट्रोलचे प्रति लिटर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यात राज्यात पेट्रोल दरवाढीसाठी भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बोट दाखवला आहे. अजित पवार यांनी राज्यात पेट्रोल आणि डीझेल जीएसटीमध्ये आणण्यात विरोध केला. अन्यथा पेट्रोल आज 30 रुपयांनी स्वस्त झाले असते असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोमवारी कोल्हापूरमध्ये बोलताना म्हणाले आहेत.

लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेच्या विरोधात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला. त्याविरोधात कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. अजित पवार एक अतिशय हुशार राजकारणी आहेत. ते नेहमीच फसव्या घोषणा करतात. MPSC च्या विषयी सुद्धा त्यांनी उमेदवारांची फसवणूक करण्याच्या घोषणा केल्या. आता शेतकऱ्यांना मदत करायची वेळ आहे. त्यात अजित पवार म्हणतात, की शेतकऱ्यांसाठी कर्ज काढण्याची वेळ आली तरी काढू. ही वेळ नेमकी कधी येणार आहे असे सवाल भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला.

शेतकऱ्यांनीही गाडीतल्या चौघांना ठेचून मारले

भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्राच्या कारने लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्यात आले असा आरोप होत आहे. या प्रकरणी केवळ भाजपचेच नाव का घेतले जात आहे? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. भाजपलाच लेबल लावले जात आहे. राज्यात मावळमध्ये तर शेतकऱ्यांना शोधून-शोधून मारण्यात आले होते. या ठिकाणी एका व्यक्तीने घटना घडवली. त्याला पकडून चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी. या घटनेच्या वेळी शेतकऱ्यांनी सुद्धा गाडीतील चौघांना ठेचून मारले असे पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्र बंद पाळला जात आहे असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. परंतु, या बंदचा शेतकऱ्यांना काही फायदा झाला का? प्रत्यक्षात महाराष्ट्र बंद हा राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार आहे. जनतेला सगळे कळते. जनतेचा रोष येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...