आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:डॉ बाबासाहेबांच्या उपस्थितीतील ऐतिहासिक "माणगाव परिषद-1920" या लघुपटाचे आॕनलाईन लोकार्पण

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय निर्मित "माणगाव परिषद-१९२०" या लघुपटाचे आॕनलाईन लोकार्पण सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. हा ऐतिहासिक ठेवा या लघुपटाच्या माध्यमातून समोर आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित १९२० साली झालेल्या परिषदेला १०१ वर्षपूर्ती निमित्ताने हा लघुपट प्रतिकात्मक स्वरुपात तयार केला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती बनविण्यात आली होती. ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहास तज्ज्ञ डाॕ जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डाॕ अशोक चौसाळकर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि संवादशास्त्र विभागप्रमुख डाॕ निशा मुडे, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डाॕ आलोक जत्राटकर यांचा या समितीत समावेश होता . पुण्याच्या रिडिफाईन काॕन्सेप्टस या संस्थेचे योगेश देशपांडे यांनी याची निर्मिती-दिग्दर्शन केले आहे.

या लोकार्पण प्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन / मा ) गणेश रामदासी (माहिती संचालक )गोविंद अहंकारी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. सचिव तथा महासंचालक डाॕ दिलीप पांढरपट्टे यांनी प्रास्ताविकात लघुपटनिर्मितीमागील पार्श्वभूमी सांगितली. मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी सर्वांचे आभार मानले.

"माणगाव परिषद-१९२०" या लघुपटाविषयी माणगाव परिषद ही देशाच्या राजकीय, सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. परिषदेला गेल्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रारंभीच्या काळातील एक महत्त्वाची घटना म्हणजे माणगाव परिषद. राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने कागल संस्थानातील माणगाव येथे दोन दिवस ही परिषद पार पडली. शाहू महाराज यांनी जाहीर रित्या डॉ आंबेडकर यांना नेता म्हणून संबोधणे, ही मोठी सामाजिक घटना होती. या परिषदेच्या संपूर्ण आयोजनासाठी जो खर्च आला, तो अप्पा दादागोंडा पाटील यांनी केला. त्यांच्या या पुढाकारामुळे चिडून जाऊन जातपंचायतीने त्यांना सात वर्षे वाळीत टाकले होते. शिवाय ही परिषद होऊ नये, यासाठी सनातन्यांनी प्रयत्न केले. हा निव्वळ सभा-समारंभ नसून, एका व्यापक लढ्याची सुरुवात होती.

माणगाव परिषदेला उपस्थित राहून शाहू महाराजांनी सविस्तर भाषण केले. ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेत पोहोचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी शोधून काढीत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळवण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही अप्पलपोटी मंडळी अयोग्य पुढारी देऊन अज्ञानी लोकांना फसवतात.’’ बाबासाहेबांबद्दल त्यांनी गौरवोद्‌गार काढले. ‘आंबेडकर पर्वा’चा प्रारंभ कशारितीने होत होता, याची चुणूक माणगाव परिषदेने दाखविली होती

बातम्या आणखी आहेत...