आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:घर दोघांचं, शेत दोघाचं; ग्रामीण महिलांसाठी महासमृद्धी सक्षमीकरण अभियान

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभियान राबवताना कोरोनाचे नियम पाळण्यात यावेत, अशा सूचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत

घर दोघांचं, शेत दोघांचं या उपक्रमासह ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या जागतिक महिला दिनापासून (८ मार्च) महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी शेत दोघांचे (७/१२ वर पती व पत्नीचे नाव लावणे) आणि घर दोघांचे (नमुना नंबर ८ वर पती व पत्नीचे नाव लावणे) या संकल्पनेअंतर्गत मालमत्तेवर पती व पत्नीचे नाव लावणे हा महत्त्वपूर्ण उपक्रम या अभियानांतर्गत सुरू करण्यात येणार अाहे. त्याशिवाय प्रामुख्याने महिला बचत गटांना प्रदर्शने, कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये उत्पादनांच्या विक्रीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढवणे, पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे आदी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

अभियानात महिलांच्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन हिमोग्लोबिन व बीएमआय तपासणी करून त्यांना पोषणाबाबत मार्गदर्शन करणे, महिलांमधील तंबाखूमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकीरमुक्ती आदींबाबत जनजागृती करणे, महिलांच्या उपजीविकेचे स्रोत वाढवण्यासाठी निधी आणि कर्ज उपलब्धतेसाठी मदत करण्यात येईल. महिला बचत गटांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी आकर्षक ब्रँडिंग व पॅकेजिंगवर काम करण्यात येईल. स्मिता योजनेअंतर्गत सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता आणि विक्रीस चालना देण्यात येणार असून महिला लाभार्थींच्या बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांमध्ये गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, तसेच मंजूर झालेल्या घरकुलांचे भूमिपूजन करून बांधकाम सुरू करण्यात येईल, असे मुश्रीफ म्हणाले.

कायदेशीर मोफत सल्ला : कौटुंबिक हिंसाचार व कायद्यांबाबत महिलांना मार्गदर्शन करणे व कायदेविषयक मोफत साहाय्य व सल्ला देण्यासाठी उपक्रम राबवण्यात येतील. महिला लाभार्थींच्या बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांमध्ये गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, तर घरकुल मंजूर झालेल्या महिला लाभार्थींच्या घरकुलांचे भूमिपूजन करून बांधकाम सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले.

कोरोनाचे नियम पाळून अभियान
अभियान राबवताना कोरोनाचे नियम पाळण्यात यावेत, अशा सूचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत. तसेच अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हे, तालुके आदी विविध घटकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

जागतिक महिला दिनापासून सुरुवात

  • प्रदर्शने, कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये बचत गटांना उत्पादन विक्रीची संधी
  • महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण
  • तंबाखूमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकीरमुक्ती आदींसाठी जनजागृती
  • कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी कायद्यांबाबत मार्गदर्शन
  • स्मिता योजनेअंतर्गत सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता, विक्रीस चालना.
बातम्या आणखी आहेत...