आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर:अंबाबाई मंदिरातील मणकर्णिका कुंड उत्खननातून उलगडणार बारवशिल्पाचा ठेवा

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

शिल्पसौंदर्याने नटलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई ( महालक्ष्मी) मंदिरातील प्राचीन मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाच्या प्राथमिक टप्प्यातील कामास सुरुवात झाली आहे. उत्खननातून मंदिर प्राकारातील बारव शिल्पाचा एक प्राचिन ठेवा पुनर्जीवित होणार आहे. मंदिराच्या सौंदर्यात यामुळे अधिक भर पडणार आहे. पुरातत्त्व विभागाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन काम केले जाणार आहे.

अंबाबाई मंदिरातील मनकर्णिका कुंडाला ऐतिहासिक महत्त्व असल्याने हे कुंड पुन्हा भाविकांसाठी खुले करून परिसराचा विकास करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने घेण्ययााा आला आहे. मंदिर विकास आणि पर्यटन वाढीच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. कोरोनामुळे मंदिर बंद असले तरी विकासकामे सुरू झाली आहेत.

गेली ६२ वर्षे ही जागा महापालिकेच्या ताब्यात होती

अंबाबाई मंदिरातील घाटी दरवाजालगत असलेल्या मनकर्णिका कुंडाची ६८०० चौरस फूट जागा, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मालकीची आहे. १९५७मध्ये कोल्हापूर महापालिकेने पब्लिक गार्डन विकासाच्या नावे देवस्थान समितीकडून जागा ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर हस्तांतरित केली. महापालिकेने या जागेवर बगिचा विकसित केला; पण कालांतराने १९९९ मध्ये 'पे अँड यूज' तत्त्वावर स्वच्छतागृह उभारले व भाडेतत्त्व कराराचा शर्तभंगही केला. देवीच्या स्नानाचे पाणी जाणाऱ्या मनकर्णिका कुंडाच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारून भाविकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करून २०१६ मध्ये हिंदुत्ववादी कार्यकत्यांनी आंदोलन करून शौचालयाचे बांधकाम पाडले.

दरम्यान, देवस्थान समिती सचिवांकडून मनकर्णिका कुंड खुले करण्याचे काम मंदिर विकासांतर्गत येत असून, जागा देवस्थान समितीकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी महापालिकेकडे केली. यानुसार महापालिकेकडून जागा हस्तांतरण होऊन मनकर्णिका कुंड उत्खननाच्या कामास सुरुवात झाली आहे. कुंडाच्या जागेतील स्वच्छतागृह पाडून जमीन सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष उत्खननाचे काम सुरु होणार आहे.

मणिकर्णिका कुंडांचे धार्मिक महत्व

मणिकर्णिका नावाने देशभरात दोन कुंड आहेत. एक काशी येथे आहे: तर दुसरे करवीर क्षेत्री. मूळ मणिकर्णिका नावाने स्थित असलेल्या या कुंडाच्या नावाचा अपभ्रंश होऊन आता याचे नाव मनकर्णिका कुंड असे झाले आहे. देवी करवीर क्षेत्री आल्यानंतर देवीची कुंडले हरविली. ही कुंडले शोधताना ज्या जागेवर कुंडाची निर्मिती झाली, ते हे मणिकर्णिका कुंड असल्याचा करवीर माहात्म्यामध्ये उल्लेख आहे. दक्षिण भारतातील मंदिरांच्या ठिकाणी दोन जलकुंड असतात. एक ज्यामधून देवाच्या स्नानासाठी जल घेतले जाते. दुसरे ज्या जलकुंडात भूमागनि देवाच्या स्नानाचे पाणी सोडले जाते. जमीनीपासून खोलवर पाणी साठ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पायर्या असणारे असे हे बारवशिल्प पध्दतिचे कुंड आहे.

अंबाबाई मंदिराही घाटी दरवाजा बाहेर डाव्या बाजूला विश्वेश्वराच्या मंदिरासमोर काशी कुंड आहे. तर घाटी दरवाजाच्या आत आल्यानंतर उजवीकडे मनकर्णिका कुंड आहे. या कुंडामध्ये भूमागनि देवीच्या स्नानाचे तीर्थ जाते.

या आहेत पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शक सूचना

- उत्खननासाठी कोणत्याही मशिनरीचा वापर करू नये

- कामासाठी कुशल मन्युष्यबळाचा वापर करावा.

- खोदकाम तज्ञांच्या देखरेखीखाली व्हावे

- शिल्पसौंदर्यास बाधा न आणता काम करावे.

असे होते मनकर्णिका कुंड

- चौकोनी ६० × ६० आकाराचे

- कुंडाची खोली साधारण ४० फुट खोल

- दोन बाजूला पायर्या, एका बाजूला चढाव

- कपडे बदलण्यासाठी ओवर्याही होत्या

- तिर्थ मुजवताना पाषाणातील अनेक मूर्ती आढळल्या, या मूर्ती मंदिर प्राकारात स्थापित करण्यात आल्याचे मूर्ती अभ्यासक ऍड प्रसन्न मालेकर यांनी सांगितले.