आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कलावंताची हेटाळणी का?:तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडेंचा सवाल; म्हणाल्या - गौतमीचा व्हिडिओ व्हायरल करणे निंदनीय

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा ड्रेसिंग रूममधील व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. महिला कलावंताचा असा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणे निंदनीय असल्याचे सांगत प्रसिद्ध लोककलावंत, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तमाशा सम्राज्ञी मंगला बनसाडे-करवडीकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रातील आपल्याच कलावंताची हेटाळणी का करता, असा सवालही त्यांनी केला आहे.

आपला महाराष्ट्र हा जिजाऊंचा, माता रमाबाई आणि सावित्रीबाईंचा आहे. यूपी अथवा बिहार नाही. गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील लोककलावंत आहे. ती आधी एक स्त्री आहे आणि मग कलावंत आहे. गौतमीच्या अश्लील हावभावाच्या नृत्याबद्दल आपण आक्षेप घेतला. तो देखील बरोबर आहे. त्याबद्दल तिने माफीही मागितली. परंतु, ड्रेसिंग रुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करने हे निंदनीय आहे. कृपया असे करू नका, असे आवाहन तमाशा सम्राज्ञी मंगला बनसाडे यांनी केले.

परराज्यातून तसेच शेजारील देशांतून हिंदी चित्रपटातील कलाकार आपल्या महाराष्ट्रात आले. आपल्या पाच पिढ्या बसून खातील एवढा पैसा ते कमावून बसले आहेत. मग या आपल्या महाराष्ट्रात आपल्याच कलाकारांची आपण हेटाळणी का करताय, असा जळजळीत सवाल मंगला बनसोडे यांनी महाराष्ट्रातील तमाम लावणी आणि तमाशा रसिकांना केला आहे.

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमात चेंजिंग रूममध्ये कपडे बदलतानाचा चोरून काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला केल्याप्रकरणाची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. या प्रकरणात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

महिलांच्या बाबतीत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा, असे महिला आयोगाने पोलिस महासंचालकांना कळविले असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.

गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. गौतमी पाटील हिच्या नृत्याला विरोध असला तरी अशा प्रकारे बदनामीच्या हेतूने व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचे आणि निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या माध्यमांतील कलावंतांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून महाराष्ट्राच्या लोककलेच्या संस्कृतीची आठवण करून दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...