आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात आज म्हणजेच 16 जूनपासून कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी पहिले आंदोलन होत आहे. दरम्यान, कोल्हापुरात आज जोरदार पाऊस कोसळत आहे. पण, भर पावसात हा मराठा मोर्चा निघत आहे.
मराठा आरक्षणासाठीचा हा राज्यातील पहिला मराठा मोर्चा कोल्हापुरात निघत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. हे आंदोलन मूक असेल. या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर आहेत. तसेच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली आहे.
समाजाला दिशा देण्यासाठी आजचे आंदोलन- संभाजीराजे
खासदार संभाजीराजे छत्रपती माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचे आंदोलन आहे. हा मूक मोर्चा आहे. आज लोकप्रतिनिधी बोलतील. समाजाला न्याय मिळावा अशी सरकारला विनंती आहे. आमचा लोकप्रतिनिधींवर विश्वास आहे, मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
चंद्रकांत पाटलांकडून पाठिंब्याचे पत्र सुपूर्द
कोल्हापुरातील आंदोलनस्थळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट झाली. यावेळी चंद्रकांत पाटलांकडून संभाजीराजेंना पाठिंब्याचे पत्र सुपूर्द करण्यात आले आहे.
कोल्हापुरात कडेकोट पोलिस बंदोबस्त
मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलनाला राज्यभरातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोना संकटाचे सर्व नियम पाळून आंदोलन व्हावे, असे आवाहन कोल्हापूर पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.