आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी खा. संभाजीराजे छत्रपतींनी पुकारलेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनाला बुधवारी कोल्हापुरातून सुरुवात झाली. राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार-खासदार तसेच लोकप्रतिनिधी या आंदोलनाला पाठिंबा देत सहभागी झाले.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून सकारात्मक आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तत्काळ मुंबईला यावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घडवून आणू, अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री पाटील व आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिली. त्यानुसार गुुरुवारी वर्षा निवासस्थानी संभाजीराजे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सायंकाळी ५ वाजता भेट होत आहे.
दरम्यान, या तीन मंत्र्यांसह जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदारांनी हा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारीत राहिला नसल्याचे स्पष्ट करून केंद्राने कायदा करून प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. त्यासाठी दिल्लीला मोर्चा, आंदोलने करून धडक द्यावी लागेल, असा इशाराही दिला. कोल्हापुरातील १० आमदार, खासदार, मंत्र्यांची या वेळी उपस्थिती होती. याशिवाय प्रकाश आंबेडकर, शाहू महाराज छत्रपती, मालोजीराजे, संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती आदी आंदोलनात सहभागी झाले.
समाज बोलला, आता लोकप्रतिनिधींनो बोला’
“समाज बोलला, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला’ या टॅगलाइनखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींनी भरपावसात आंदोलनाला पाठिंबा देत आपली भूमिका स्पष्ट केली.
आरक्षण मिळालेच पाहिजे
५० टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा असल्याचे कारण पुढे करत मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ होत आहे. परंतु गरीब मराठ्यांच्या कल्याणासाठी आरक्षण गरजेचे आहे. मराठ्यांना शिक्षण-नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे.' हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री
भाजपचाही पाठिंबा...
मी कोल्हापूरचा नागरिक म्हणून आलो आहे. या आंदोलनात भाजपचे नेते सहभागी होतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या सवलती आधीच्या सरकारने दिल्या होत्या, त्या आताच्या सरकारने द्याव्यात, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
आ. विनायक मेटेंकडून आंदोलनाचे स्वागत
आंदोलनाचे स्वागत, परंतु आरक्षणप्रश्नी राज्य सरकार झोपलेले आहे. त्यामुळे बोलणारे, हक्क मागणारे, न्याय मागणारे आंदोलन झाले असते तर बरे झाले असते, असे शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी नमूद केले.
मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक
अण्णासाहेब पाटील महामंडळ, सारथी संस्थेला बळ देणे, या समाजातील गरिबांना ओबीसींच्या धर्तीवर सवलती, मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर नवीन होस्टेल्स या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका मांडली.
सलाइन लावून आंदोलनस्थळी...
शिवसेनेचे खा. धैर्यशील माने यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात केली असली तरी अजूनही उपचार सुरू आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी माने गाडीत सलाइन लावून आंदोलनस्थळी पोहोचले.
दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवा - शाहू छत्रपती महाराज
मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाला सोबत घेतले पाहिजे. एकमुखाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी हे मूक आंदोलन झाले. हा आवाज निश्चित मुंबईपर्यंत जाईल. तो दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यातील ४८ खासदारांसह राज्य सरकारने हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवायला हवा, अशी अपेक्षा शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केली.
...तर नाशिकमध्ये आनंदोत्सव साजरा करू - खासदार संभाजीराजे छत्रपती
राज्य सरकारने चर्चेचे आमंत्रण दिले असले तरी नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगडचे नियोजित आंदोलन होणारच आहे. चेतावणी देण्याचा आमचा स्वभाव नाही. राज्य सरकारने चर्चेचे निमंत्रण दिले आहे. सकारात्मक निर्णय घेतल्यास नाशिकमध्ये होणारे आंदोलन आनंदोत्सव म्हणून साजरा करू.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.