आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बहीण भावाच्या नात्यातील स्नेह वाढवणारा सण म्हणजे भाऊबीज...या दिवशी भावाचे औक्षण करून त्याच्या दिर्घायुष्याची कामना सगळ्या बहिणी करतात. पण आज भाऊबीजेच्या दिवशी शहीद जवान ऋषिकेश यांची बहिण कल्याणी हिच्यावर ऋषिकेशच्या पार्थिवाचे औक्षण करण्याची वेळ आली. ऋषिकेश यांच्या पार्थिवाचे तिने औक्षण करताच उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. अत्यंत वेदनादायी असा क्षण कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडितील ग्रामस्थांनी आज अनुभवला.
आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील जवान ऋषिकेश जोंधळे हे काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले. आज कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी गावात शासकिय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी ऋषिकेश शहीद झाले. ही बातमी समजता आई-वडिल आणि बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गावात शोककळा पसरली. चार दिवसांनी ऋषिकेशचे पार्थिव गावात दाखल झाले.
ऋषिकेश यांच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक पहाटे पासून उपस्थित होते. वीर जवान अमर रहे चर्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ऋषिकेश जोंधळे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
सकाळी साडे सातच्या सुमारास बहिरेवाडी या ऋषीकेश यांच्या मुळगावी पार्थिव आणण्यात आले. त्यांच्या घरासमोर पार्थिव ठेवल्यानंतर कुटूंबियांनी आक्रोश केला. अवघ्या वीस वर्षांच्या या जवानाचे अंत्यदर्शन घेताना अनेकांना अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर गावात अंतयात्रा काढण्यात आली. अंतिम यात्रा भैरवनाथ हायस्कूलच्या मैदानात आल्यानंतर पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले.
या ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, अमरजीत राजा घाटगे, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली. लष्कर आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी भारत माता की जय....चा जयघोष झाला. शहिद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी खबरदारी घेतली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.