आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हूक्केरी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिक हादरले गेल्या चार दिवसांपासून बेळगाव परिसरात अधून मधून परतीचा पाऊस कोसळत आहे. दरम्यान रविवारी सकाळपासूनच बेळगाव शहर आणि परिसरात आकाशात काळे ढग पाहायला मिळत होते. हूक्केरी येथे दुपारी अचानक पणे सुरु झालेल्या धुवाधार पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तब्बल तासभर ढगफुटी सदृश्य कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. भाजी, फळ विक्रीच्या हातगाड्या रस्त्याकडेला उभा असलेली वाहने कचरा वाहून जावा तशी वहात चालली होती.
कोल्हापूर जिल्ह्यालाही परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने गडहिंग्लज शहरातील नागरिकांचे हाल झाले. शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. रस्त्यावर पाण्याचे लोट वहात होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.आजरा भागातही पाऊस मोठा झाला आहे. या पावसामुळे आजरा, गडहिंग्लज मधील भात, ऊस पीक, भुईमूग, ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे.
पावसाचा जोर प्रचंड असल्यामुळे हुक्केरी तील रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहताना पाहायला मिळत होते. पावसाच्या पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता, त्यामध्ये काही वाहने ही वाहून गेली. अनेकांना रस्त्यावर लावलेली आपली वाहने सुरक्षित ठेवण्यासाठी कसरत करावी लागली. हुकेरी प्रमाणेच रविवारी सायंकाळी धुवाधार पावसाने बेळगाव शहर आणि परिसराला झोडपून काढले. जोरदार पावसामुळे शहरातील वर्दळीचे रस्तेही निर्मनुष्य झाले होते. दरम्यान परतीच्या पावसामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. हुक्केरीसह निपाणी, संकेश्वर भागातही पावसाने कहर केला. हुक्केरीतील पावसात वेल्डींगचे शेड कोसळून एकाचा मृत्यू झाला. आल्लाखान नदाफ (वय 65) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर वाहून जाणाऱ्या नजीर शेंगडी व त्यांचा नातू या दोघांना वाचवण्यात यश आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.