आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आणि त्यात कोणत्या मातोश्रींची नोंद आहे, हे मला माहिती नाही. पण मला एवढेच दिसते आहे की, चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही आणि खूप काही होणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे पत्रकारांना सांगितले.
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीही आरोप केले तरी केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त आहेत, ही वस्तुस्थिती आहे. या यंत्रणांच्या तपासाची आपल्याला काही माहिती नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाला यशवंत जाधव यांच्याकडे कसली डायरी सापडली हे सुद्धा माहिती नाही. मात्र, एवढी खात्री आहे की, या चौकशीतून कोणीही सुटू शकणार नाही. खूप काही होणार आहे, हे सुद्धा दिसते आहे. मातोश्रीचा उल्लेख असलेल्या डायरीची ईडीकडून चौकशी व्हायला हवी या भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या मागणीचे त्यांनी समर्थन केले.
पाटील म्हणाले की, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या उद्घाटनाला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित करणे योग्य नाही. या महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. महानगरपालिकेने बांधलेल्या स्मारकाचे उद्घाटन करण्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करायला हवे. त्यामुळे भाजपा आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केवळ पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यास जो विरोध केला आहे तो योग्यच आहे. सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पक्षपातीपणे निर्बंध लावले असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.