आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:बाळाला जन्म देताच कोरोनाग्रस्त आईने घेतला जगाचा निरोप, डॉक्टर आणि नर्स ठरले बाळासाठी देवदुत

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

जन्म हा किती आनंदचा क्षण. पण या क्षणावरही कोरोनाचे भयान सावट पसरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना पाॅझिटीव्ह आई मुलाला जन्म देताच देवाघरी गेल्याची दुखद घटना घडली आहे. जन्मताच आईला पोरके झालेल्या त्या जीवाची तब्येतही नाजूकच होती. श्र्वास लागत नव्हता, ठोकेही जाणवत नव्हते. असे असूनही बाळाला जगवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. कोरोनाची लागण पोटातील बाळालाही झाली असावी, या शंकेने बाळाला जन्मापासूनच स्वतंत्र ठेवणे व उपचार करणे भाग पडले. जन्मानंतर तीन चार दिवसांनी तग धरलेल्या त्या चिमुकल्याचे डोळे आई पाहण्यासाठी आसूसले होते. मात्र, पीपीई किट घालून समोर असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांचेच दर्शन त्याला झाले. अन् तेच बाळासाठी खरे देवदुत ठरले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील एका गावातील जवळपास सगळे कुटुंब कोरोना पाॅझिटीव्ह आले होते. यात दिवस भरलेल्या गरोदर महिलेचाही समावेश होता. ती एका खासगी दवाखान्यात दाखल झाली, ती अत्यवस्थ अवस्थेतच. साहजिकच तिच्यासह पोटातील बाळालाही यांचा सोस सहन करावा लागला. बाळ जन्मले पण आईने मात्र जग सोडले होते. कोरोनाने माय लेकराची जन्मतः च ताटातूट केली. आईनंतर घरातील कुणीच बाळाच्या चौकशीला आले नाहीत. कारण सगळे कोरोनामुळे क्वारंटाईन होते. डॉक्टरांनी मात्र कुणाचीही वाट न पाहता बाळाला जगवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.

जन्मानंतर पहिला तास बाळासाठी खूपच कठिण होता, पण डॉक्टरांनी हार मानली नाही. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. दोन दिवस झाले तरी कुणी बाळासाठी आले नाही. बाळ व्हेंटिलेटरवरच होते. कुणी आलेच नाही तरी त्याच्या उपचारासाठी येणारा खर्च आपण करायचा पण बाळाला ठणठणीत करायचे असे व्रतच जणू डॉक्टरांनी घेतले होते. पण, चौथ्या दिवशी सैन्यात असलेल्या बाळाच्या काकांनी दवाखान्याच्या प्रशासनाकडे बाळाची चौकशी केली. बाळ जिवंत असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, हे कळताच काकांनी बाळाला जगवण्यासाठी सगळे प्रयत्न करा आम्हाला आमचे बाळ सुखरूप हवे आहे असेही सांगितले. बाळाचे बाबाही पाॅझिटीव्ह असल्याने क्वारंटाईन होते.

बाळ जन्मापासूनच आयसीयुत, ते ही एकदम स्वतंत्र. अशा या चिमुकल्या जीवाला त्याच्या उपचारासाठी अवतीभवती असलेल्या डॉक्टर आणि नर्सच आपल्या वाटू लागल्या. बाळाने उपचाराला प्रतिसाद दिला आणि तब्बल आठ दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. बाळाला जगवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार्या सगळ्यांना आनंद झाला. बाळाला कुटुंबात पहिल्यांदा पाहणारे ही त्याचे काकाच होते.

कोरोना योध्दा नव्हे देवदुतच

विशेष म्हणजे बाळाची आई कोरोना पाॅझिटीव्ह असल्याने बाळही पाॅझिटीव्ह असेल अशी शंका होती. पण, बाळाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. तरी बाळ अत्यवस्थ होते. आमच्या लेखी बाळाला जगवण्यासाठी प्रयत्न करणे हे महत्त्वाचे होते. बाळाचे कुणी नातेवाईक आहेत की नाही हे देखील आम्ही पाहीले नाही‌ पहिला त्याला योग्य उपचार सुरू केले. त्यांच्यासाठी कुणी आले नसते तरी त्याचा जीव वाचवणे आणि जगवणे आमचे कर्तव्य होते. यासाठी माझ्यासह माझ्या दवाखान्यातील सगळा स्टाफ प्रयत्न करीत होता. आज बाळ पूर्ण फिडिंग घेऊ लागले आहे. लवकरच त्यांची दवाखान्यातून सुटका होईल. असे डॉ. गोपाळ वासगावकर यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...