आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब मेमन कबरीच्या वादात उदयनराजेंची उडी:म्हणाले - राजेशाही असती तर असे घडले नसते, आम्ही बंदोबस्त केला असता

सातारा / प्रतिनिधी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीवरील सजावटीमुळे निर्माण झालेल्या वादात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनी उडी घेतली आहे. आज राजेशाही असती तर असे प्रकार घडले नसते, असे उदयनराजेंनी म्हटले आहे.

...तर आम्ही बंदोबस्त केला असता

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, तुम्ही लोकांनीच मागणी केली राजेशाही नको, लोकशाही हवी. त्यामुळे आज याकूब मेमनच्या कबरीवर असे प्रकार होत आहेत. राजेशाही असती तर केव्हाच त्या कबरीचा बंदोबस्त आम्ही केला असता. कबरीच्या उदात्तीकरणाविरोधात एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने आणि भाजपने पाऊल उचलले, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, आधीच्या महाविकास आघाडी सरकारला हे सुशोभीकरण दिसले नव्हते का, असा सवालही खा. उदयनराजे भोसलेंनी केला.

अफजल खानाची कबर खुली करावी

अफजल खान कबरीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफझल खानाची कबर प्रशासनाने खुली करायला हवी. त्याशिवाय लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास कळणार कसा? पर्यटकांसाठी सध्या ही कबर बंद आहे.

कबरीवरील दिवे काढले

वादानंतर मुंबई पोलिसांनी याकूब मेमनच्या कबरीवरील दिवे काढले आहेत. तसेच, याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. दुसरीकडे बडा कब्रस्तानचे ट्रस्टी शोएब खतीब यांनी अंधारात मृताच्या नातेवाईकांना त्रास होऊ नये, यासाठी दिवे लावले. मात्र, वादानंतर दिवे काढले, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...