आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याची तिजोरी लुटणे, हाच ED सरकारचा उद्योग:महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य सरकार केंद्रापुढे नतमस्तक; नाना पटोलेंचा हल्लाबोल

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कोणत्याही मंत्र्याने बेळगावला येऊ नका म्हणून सांगतात. याचा अर्थ महाराष्ट्रातील सरकार केंद्राच्या सत्तेपुढे नतमस्तक झाले आहे. फक्त सत्तापिपासुपणा आणि राज्याची तिजोरी लुटणे, एवढेच महाराष्ट्रातील ईडी सरकारचे चित्र पाहायला मिळत असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कराडमध्ये माध्यमांशी बोलताना केला.

जनता महाराष्ट्राचे लचके तोडू देणार नाही, जनतेच्या पाठिशी राहून काँग्रेस सीमावादाची लढाई लढेल, अशी भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली.

मनुवाद्यांची मानसिकता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशाचा खरा इतिहास पुसून टाकायचा, ही मनुवाद्यांची मानसिकता बनलेली आहे. मनुव्यवस्थेच्या आधारे त्यांना जो इतिहास निर्माण करायचाय त्याची ही परिणिती आहे. अडचणीच्या काळात देश उभा करण्याचे काम पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी केले. आज जेवढे रिसर्च सेंटर्स आहेत. ती पंडीत नेहरूंनी निर्माण केली आहेत. नेहरूंना देखील काही छायाचित्रांवरून ही मंडळी बदनाम करत आहेत. त्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करत आहेत.

आम्ही शिवशाहीसोबत

पटोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा देखील प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यामुळेच त्यांच्या विचारांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे. आम्ही शिवशाहीसोबत राहणार आहोत. ज्यांना पेशवाईसोबत रहायचे असेल त्यांनी राहावे.

मुठभर लोक श्रीमंत

पटोले म्हणाले, देशातील न्यायाधीश जर माध्यमांसमोर जाऊन न्याय मागतात. यावरून देशातील परिस्थिती लक्षात येते. न्यायव्यवस्थेवर सरकारचा किती दबाव आहे ते स्पष्ट होते. लोकशाहीच्या चारही स्तंभांना स्वायत्ता राहिलेली नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारांपासून लोकांना वंचित ठेवले जात आहे. मूठभर लोकांना न्याय मिळतोय, मूठभर लोक श्रीमंत होताहेत आणि सामान्य लोकांना लुटले जात आहे. याला जर कोणी भारत एकसंघ म्हणत असेल तर तो त्यांच्यासाठी लखलाभ आहे काँग्रेससाठी नाही. काँग्रेस हा सामान्य लोकांसाठी संविधानाच्या आधारावर लढणारा पक्ष आहे.

बुथ ताब्यात घेतले गेले

पटोले म्हणाले, देश दुहीच्या आणि तुटण्याच्या मार्गावर असल्यानेच देशाची एकसंघता आणि संविधान वाचविण्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली. गुजरात निवडणुकीत बुथ ताब्यात घेतले जात असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री मतांची भीक मागण्यासाठी गुजरातमधील गल्लोगल्लीत फिरत आहेत. गुजरातच्या जनतेने भाजपला बाजूला सारण्याचे काम सुरू केले आहे. त्या भीतीपोटीच पंतप्रधानांना गल्लोगल्ली फिरावे लागत आहेत.

कुणाला फायदा नाही

नाना पटोले म्हणाले. तसेच गुजरातमध्ये भाजपला सत्तेवरून बाजूला करण्याचा निर्णय जनतेने घेतल्याचे स्पष्ट होत असून काँग्रेसच नंबर एकचा पक्ष म्हणून पुढे येईल. आश्वासने देऊन भाजपचे सरकार सत्तेवर आले. काश्मिरमधील 370 कलम हटविल्याचा कोणालाच काही फायदा झालेला नाही. तिथे साधी निवडणूक पण घेऊ शकत नाहीत. अजुनही राष्ट्रपती राजवट पाहायला मिळते. आता समान नागरी कायदा आणण्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. परंतु, देशात पहिल्यापासूनच समान नागरी कायदा आहे. परंतु, शब्दछल करून महागाई, बेरोजगारी, शेतकरी, गरीबांच्या प्रश्नांवरून देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक हा मुद्दा पुढे आणला जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...