आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची (अंबाबाई) मंदिरात आज घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाचा शुभारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीची 'महाशक्ती कुण्डलिनीस्वरुपा' रूपात पूजा बांधण्यात आली होती. नवरात्रोत्सवातील पहिल्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने देवस्थानच्या अधिकृत वेबसाइटचे डिजिटलायझेशन करुन देवीची नित्य पूजा, लाइव्ह दर्शन आणि संपूर्ण उत्सव भक्तांसाठी एका क्लिकवर उपलब्ध करून दिला. फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, ट्वीटर या सोशल मीडियावरही आजपासून आई अंबाबाईचे दर्शन होईल. शिवाय देवस्थानची सर्व माहिती विविध भाषांमधून उपलब्ध होणार आहे.
तोफेची सलामी देऊन मंदिरात नवरात्रोत्सवाचा शुभारंभ झाला. सकाळी आठ वाजता मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये करवीरनिवासिनीचे करवीरमाहात्म्यातील निवडक स्तोत्रांमधून होणारे दर्शन ही संकल्पना राबविली आहे. सर्वच स्तोत्रांमधून श्रीकरवीरनिवासिनीचे व्यापक आणि आदिशक्ति स्वरूपच वारंवार प्रगट होताना दिसते. अशा महाशक्तिची करवीरमाहात्म्यातील निवडक स्तोत्रे, मुळ संस्कृत संहिता आणि त्यांची मराठी आवृती, या निमित्ताने जगदंबेच्या भक्तांपर्यंत पोहोचणार आहेत. आज प्रतिपदेला करवीरनिवासिनीची 'महाशक्ति कुण्डलिनीस्वरुपा' रूपात पूजा बांधण्यात आली. प्रतिपदेला करवीरनिवासिनी महाशक्ती कुण्डलिनीस्वरूपात स्थानापन्न झालेली आहे. कुण्डलिनी हीच आत्मशक्ति. निर्माण, पालन आणि संहाराची शक्ति. ही कुंडलिनी प्राणशक्ती, आधार शक्ती आणि त्यामुळेच परब्रह्म स्वरूपा अशी आहे.
नवरात्रोत्सवात भक्तांच्या गर्दीने फुलून जाणारे मंदिर आज शांत होते. अनेक भक्तांनी मंदिराच्या बाहेरुन कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.