आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअधिकारी मुद्दाम उद्दामपणा करत असेल, पैसे मागत असेल, चुकीचे वर्तन करत असेल तर त्या बाबतीत पुरावे दिल्यास आपण संबंधितांवर कारवाई करू शकतो. हा महाराष्ट्र आहे, इथे बेबंदशाही चालणार नाही, असा इशारा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला. त्या सातारा येथे बोलत होत्या.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते , हर्षद कदम , महिला आघाडीच्या छायाताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या बाजार समित्यांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असून, त्याबाबतीत काय भूमिका घ्यायची असा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला होता. त्या अनुषंगाने बोलताना , महाविकास आघाडीचा वरिष्ठ पातळीवरचा समन्वय पक्का आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीला अद्याप वेळ आहे. पण आताच्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने तुम्हाला कशा पध्दतीने जनतेला न्याय मिळवून देता येईल त्याचा फॉर्म्युला पक्षापुढे ठेवा. त्यावर पक्षाच्या निर्देशानुसार पुढे जाता येईल, असे विचार डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी मांडले.
सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या दृष्टीने आपल्याला चिंता करण्यासारखे काही वाटत नाही. कारण आपल्या शिवसेना पक्षाला सातारा जिल्ह्याने खासदार - आमदार दिले आहेत. ते तुमच्या सर्वांच्याच मतांवर, ताकदीवर आणि परिश्रमावरच निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी समन्वयक, संपर्कप्रमुख यांच्याशी समन्वय ठेवून दिशा ठरवा, असे आवाहनही त्यांना केले.
जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख अशी दहा अकरा लोकांची उपसमिती करा. आपल्याला कोठे, किती जागा लढवता येतील ते त्यामध्ये समन्वयक, संपर्कप्रमुख यांना सांगा. त्यानंतर संपर्कप्रमुख आपल्याला योग्य त्या सूचना देतील, त्याप्रमाणे तुम्ही करा. मनाने काही करून गोंधळ करून ठेवण्यापेक्षा हे योग्य होईल. आपण काहीच केले नाही व त्यामुळे आपली संधी गेली अशी मनात रूखरूख राहील. राजकारणात कोणी स्वतःहून कोणाला सामावून घेत नाही. प्रत्येकजण स्वतःच्या ताकदीवर असतो. त्यामुळे आपल्या ताकदीचा विचार करून त्याप्रमाणे निर्णय घ्या, असा कानमंत्र त्यांनी दिला. आपण आपल्या वाटेने निघालो आहे. अशा वेळी कोण कुठे गेले याचा विचार करत न बसता तुम्ही तुमचे काम व्यवस्थित करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आरक्षणाप्रमाणे आपली तयारी ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकहिताच्या विविध कामांसंदर्भात प्रशासन पोलीस यंत्रणेकडे जावे लागेल, तेव्हा त्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. एखादा अधिकारी मुद्दाम उद्दामपणा करत असेल, पैसे मागत असेल, चुकीचे वर्तन करत असेल तर त्या बाबतीत पुरावे दिल्यास आपण संबंधितांवर कारवाई करू शकतो. हा महाराष्ट्र आहे, इथे बेबंदशाही चालणार नाही, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षद कदम, छायाताई शिंदे यांची भाषणे झाली. बैठकीस युवासेना जिल्हाप्रमुख माऊली पिसाळ, महेश शिर्के, जिल्हा उपप्रमुख विश्वनाथ धनावडे, तालुकाप्रमुख सागर रायते, नाना पाटील, नितीन गोळे, संतोष चव्हाण, मनोज शेटे, आदेश जमदाडे, विकास नाळे, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, शिवराजं टोणपे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.