आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हैदराबादच्या निजामाची महाबळेश्वरमधील मालमत्ता सील करण्यात आली आहे. भाडेतत्त्वावरील १५ एकर १५ गुंठ्याचा भूखंड आणि त्यावरील आलिशान वुडलाॅन बंगल्यावर ही कारवाई केली. महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या बंदोबस्तात मुख्य बंगल्यासह आजूबाजूच्या इमारती ताब्यात घेतल्या. सध्या बाजारभावाप्रमाणे या मिळकतीची किंमत २५० कोटी रुपयांच्या घरात आहे.
माहितीनुसार, मुख्य बंगल्याशेजारच्या कर्मचारी इमारतीत अनेक वर्षे माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक कुमार शिंदे राहत आहेत. शनिवारी सकाळी वुडलॉन बंगल्यावर दाखल झालेल्या तहसीलदारांनी शासकीय कारवाईची माहिती देऊन शिंदंेना साहित्य बाहेर घेऊन बंगला सोडण्यास सांगितले. आदेशाप्रमाणे त्यांनी शनिवारी संध्याकाळपर्यंत बंगला रिकामा केला. त्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीत मुख्य बंगल्याच्या सर्व खोल्या, निजामांच्या स्टाफ क्वार्टरसह दोन्ही गेट सील केले. मिळकत ताब्यात घेण्यासाठी आलेल्या जमावामुळे या भागात १ डिसेंबर रोजी तणाव निर्माण झाला होता. मात्र, या वेळी बंदोबस्ताची कुमक शनिवारी मिळाली. त्यानंतर कारवाई केली.
व्यावसायिक व नवाबात जागेवरून वाद : २०१६ मध्ये मिळकतीचे हस्तांतरण झाले व मिळकतीवर डायरेक्टर हर्बल हाॅटेल प्रा. लि. तर्फे दिलीप ठक्कर यांचे नाव लागले. त्यानंतर ठक्कर व नवाब यांच्या वादात ही मालमत्ता अडकली होती.
नबाबाकडे होती ५९ लाख रुपयांची थकबाकी ब्रिटिशांनी हा भूखंड भाडेपट्ट्याने पारशी वकिलांना दिला होता. स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये हा भूखंड हिज हायनेस नबाब मीरसाब उस्मान अल्लीखान बहादूर नबाब ऑफ हैदराबाद यांच्या नावे केला. नवाबांकडे आयकराची ५९ लाख ४७ हजार रुपयांची थकबाकी होती. या आयकर वसुलीसाठी टॅक्स रिकव्हरी ऑफिसर कोल्हापूर यांच्या पत्रानुसार थकबाकीची नोंद मिळकत कार्डावर करण्यात आली. जोपर्यंत ही वसुली होत नाही तोपर्यंत ही मिळकत विक्री करणे, गहाण ठेवणे इतर व्यवहारास मनाई केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.