आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खबरदारी:‘मास्क नाही तर प्रवेशही नाही’ कोल्हापुरी पॅटर्न आता राज्यभरात, शासनाचे परिपत्रक जारी

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा अभिनव पॅटर्न राबवून कोल्हापूरकरांची कोरोनावर मात

‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ हा अभिनव पॅटर्न राबवून कोल्हापूरकरांनी कोरोनावर मात केली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरू केलेली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गौरवलेली ही अभिनव मोहीम राज्यभर राबवण्याबाबत नगर विकास विभागाने सोमवारी शासन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, शारीरिक अंतर नाही तर वितरणही नाही’ अशी अभिनव मोहीम सुरू केली. यात मास्कचा वापर, शारीरिक अंतर पाळणे, सॅनिटायझर यावर भर दिला आहे. ग्राहकाने मास्क घातला नसेल तर दुकानदार त्याला प्रवेश देणार नाही आणि दुकानदाराने घातला नसेल तर ग्राहक वस्तू खरेदी करणार नाही. याचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना दंड तसेच आस्थापना सीलबंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले आहेत.

या मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी गौरव करून राज्यात इतर जिल्ह्यांनीही याचे अनुकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबईत ‘बेस्ट’ च्या सर्व बस स्थानकावर याचे फलक लावण्यात आले आहेत. ही मोहीम राज्यभर राबवण्याबाबत नगर विकास विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांनी २ नोव्हेंबर रोजी शासन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. नागरिकांमध्ये मास्क वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या शासन परिपत्रकात सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मास्क शिवाय बाहेर पडू नये. यासाठी सर्व महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतींनी विशेष मोहीम राबवावी. यामध्ये मास्क वापरण्यासंदर्भात व्यापक प्रचार, प्रसार व प्रसिद्धी विविध माध्यमांद्वारे करणे. मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावणे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आयुक्त/ मुख्याधिकारी यांनी विशेष दक्षता घेऊन मोहीम राबवण्यात यावी. मोहीम राबवताना त्यामध्ये सर्व सामान्य नागरिकांचा सहभाग कसा वाढेल, यासाठी नावीन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करावा. या उपरोक्त जे नागरिक मास्क किंवा प्रतिबंधक उपायांचा अवलंब करण्याकडे दुर्लक्ष करीत असतील अशा नागरिकांवर नियमांनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. मास्क नाही प्रवेश नाही याबाबत विशेष मोहीम राबवावी अशा सूचना परिपत्रकात आहेत. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.